You are currently viewing माय मराठी

माय मराठी

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री गझलकारा प्रा.सुनंदामाई पाटील लिखित अप्रतिम कविता*

 

*माय मराठी*

 

साहित्याच्या समईमधली वात मराठी

जगण्यासाठी उजेड देते ज्योत मराठी

वर्ण स्वरांची बाग बहरली फुले उमलली

काव्य कथांचे तारांगण ही रात मराठी

 

लय तालाच्या झुडूपाचे हे पान मराठी

अलंकापुरी भावभक्तीचे दान मराठी

कितीक भाषा भगिनी तिजला जगता माजी

*आई म्हणुनी अग्रपुजेचा मान मराठी*

 

अभंग ओवी श्लोकामधली गेय मराठी

आर्या भारुड पोवाड्याचे श्रेय मराठी

सजे लावणी सौंदर्याला उपमा नाही

मराठीत मी जगणे मरणे ध्येय मराठी

 

मातेच्या गर्भात उमगली मला मराठी

*कोण आईला दुष्ट बोलतो “बला” मराठी”*

देवनागरी लिपी आमची वैभवशाली

दिक्कालाच्या पार पोचवू चला मराठी

 

साहित्याचा गिरी लंघण्या पाय मराठी

कामधेनुच्या दुग्धावरची साय मराठी

परभाषेच्या आक्रमणाने व्यथित झाली

*सहोदरांनो अता वाचवू माय मराठी*

 

*प्रा . सुनंदा पाटील*

८४२२०८९६६६

प्रतिक्रिया व्यक्त करा