‘इतिहासाची साधने – अनुभवातून ज्ञानाकडे’ या नवोपक्रमाद्वारे गणेश नाईक यांची सलग तिसऱ्या वर्षी उल्लेखनीय कामगिरी
पुणे :
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा (सन २०२५-२६) अंतर्गत प्राथमिक गटातील पूर्व माध्यमिक स्तर (इयत्ता ६ वी ते ८ वी) विभागात शिक्षक गणेश भिकाजी नाईक यांनी राज्यात तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
‘इतिहासाची साधने – अनुभवातून ज्ञानाकडे’ या त्यांच्या अभिनव उपक्रमाने परीक्षकांची विशेष दाद मिळवली. इतिहास विषय केवळ पाठांतरापुरता मर्यादित न ठेवता, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव, निरीक्षण, प्रात्यक्षिके, प्रकल्पकार्य आणि चर्चासत्रांच्या माध्यमातून इतिहासातील साधनांची ओळख करून देण्यात आली.
या कृतीशील आणि अनुभवाधारित शिक्षणपद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहास विषयाबद्दल नव्याने उत्सुकता निर्माण झाली असून, त्यांची निरीक्षण क्षमता, विश्लेषणात्मक विचारशक्ती आणि विषयाची सखोल समज वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील शिक्षकांच्या अध्यापनात नाविन्यपूर्णता वाढवणे, शैक्षणिक अडचणींवर सृजनशील उपाय शोधणे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नवे प्रयोग प्रोत्साहित करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. त्या उद्दिष्टाला साजेसा आदर्श नमुना म्हणून नाईक यांचा उपक्रम ठरला आहे.
विशेष म्हणजे, गणेश नाईक यांनी सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेत यश संपादन करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्गचे प्राचार्य राजेंद्र कांबळे, मार्गदर्शक डॉ. संदिप पवार, शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक अजित तांबे, सहकारी शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समितीने त्यांचे अभिनंदन केले आहे.
शिक्षण क्षेत्रातूनही त्यांच्या कार्याचे कौतुक होत असून, त्यांच्या या यशामुळे शाळेचा आणि जिल्ह्याचा नावलौकिक अधिकच उंचावला आहे.
