*दक्षिण आफ्रिकेचा भारतावर ७६ धावांनी विजय*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मधील सुपर–८ गट १ च्या लढतीत दक्षिण आफ्रिकेने भारताला ७६ धावांनी धूळ चारत क्रिकेटविश्वाला थक्क केले. घरच्या मैदानावर, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताला नामुष्कीचा सामना करावा लागला, तर दक्षिण आफ्रिकेने दमदार कामगिरीच्या जोरावर उपांत्य फेरीकडे भक्कम पाऊल टाकले. या ऐतिहासिक पराभवाने भारतीय चाहत्यांना मोठा धक्का बसला असून स्पर्धेतील समीकरणेही पूर्णतः बदलली आहेत.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेने २० षटकांत ७ बाद १८७ धावांचा भक्कम डोंगर उभारला. सुरुवातीच्या षटकांत भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम मारा करत आफ्रिकेला २० धावांत ३ बाद अशी कोंडी केली होती. मात्र त्यानंतर डेव्हिड मिलर आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांनी खेळाचा रंगच बदलून टाकणारी स्फोटक भागीदारी रचली. ब्रेव्हिसने २९ चेंडूत ४५ धावांची आक्रमक खेळी साकारली, तर मिलरने ३५ चेंडूत ७ चौकार व ३ षटकारांसह ६३ धावांची तुफानी खेळी करत भारतीय गोलंदाजीची अक्षरशः चिरफाड केली. त्याला ट्रिस्टन स्टब्सने २४ चेंडूत नाबाद ४४ धावांची झंझावाती साथ दिली आणि दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर १८७ पर्यंत पोहोचवला.
१८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवातच अत्यंत निराशाजनक झाली. इशान किशन शून्यावर, तर तिलक वर्मा अवघ्या एका धावेत माघारी परतला. अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांना लय सापडली नाही. एकट्या शिवम दुबेने ३७ चेंडूत ४२ धावांची झुंज दिली, तर हार्दिक पांड्याने १७ चेंडूत १८ धावांची साथ केली. मात्र सातत्याने पडणाऱ्या विकेट्समुळे भारतीय डाव १८.५ षटकांत अवघ्या १११ धावांत कोलमडला.
दक्षिण आफ्रिकेकडून मार्को यान्सनने भेदक मारा करत ३.५ षटकांत २२ धावांत ४ बळी घेत भारतीय फलंदाजीचा कणा मोडला. केशव महाराजने ३ षटकांत २४ धावांत ३ बळी मिळवत मधल्या फळीत कहर केला, तर कॉर्बिन बॉशने २ बळी घेत भारतीय डावावर अंतिम शिक्का मारला.
या सामन्यात अनेक विक्रमांची नोंद झाली. आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या सुपर–८ टप्प्यात भारताचा हा सर्वांत मोठ्या फरकाने झालेला पराभव ठरला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने झेललेला हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा पराभव ठरला. डेव्हिड मिलरने टी-२० विश्वचषकात भारताविरुद्ध अर्धशतक झळकावणारा पहिला दक्षिण आफ्रिकन फलंदाज बनण्याचा मान मिळवला, तर मार्को यान्सनने भारताविरुद्ध टी-२० विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्यांच्या यादीत आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले.
या दणदणीत विजयासह दक्षिण आफ्रिकेने सुपर–८ गटात विजयी सलामी देत उपांत्य फेरीच्या दिशेने दमदार कूच केली आहे. दुसरीकडे, भारतासाठी हा पराभव केवळ गुणतालिकेतील धक्का नसून, पुढील सामन्यांसाठी धोक्याची घंटा ठरला आहे. दबावाखालील कामगिरी, ढासळलेली फलंदाजी आणि विस्कळीत गोलंदाजी यांचे योग्य वेळी आत्मपरीक्षण न झाल्यास भारताचे आव्हान लवकरच संपुष्टात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
