दहावी-बारावी बोर्ड परीक्षा २०२६ साठी कडक नियमावली जाहीर
परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही सक्ती; नियमभंग केल्यास थेट कारवाईचा इशारा
सिंधुदुर्गनगरी
फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी राज्य व विभागीय मंडळाने कडक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. परीक्षा प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी सर्व परीक्षा केंद्र शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य आणि केंद्रसंचालकांना सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
परीक्षेदरम्यान कॉपीसह इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा अनिवार्य करण्यात आली आहे. प्रत्येक परीक्षा कक्षातील हालचालींचे चित्रीकरण सुरक्षित ठेवणे ही केंद्रसंचालकांची जबाबदारी असेल.
जर कोणत्याही परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणेत त्रुटी आढळली किंवा मंडळाच्या सूचनांचे पालन झाले नाही, तर संबंधित जबाबदार व्यक्तींवर थेट प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे परीक्षा केंद्रांवरील शिस्त अधिक कडक होणार असून, प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा मंडळाचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले आहे.
