You are currently viewing देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वार्षिक योजनेची बैठक

देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वार्षिक योजनेची बैठक

सिंधुदुर्गसाठी ६०० कोटींचा प्रारूप आराखडा; पालकमंत्री नितेश राणे यांची भरीव निधीची मागणी

मुंबई : राज्याच्या वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२६-२७ च्या प्रारूप आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी मान. मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी राज्यस्तरीय बैठक पार पडली.

या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी सुमारे ६०० कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा पालकमंत्री नितेश राणे यांनी सादर केला. जिल्ह्यात सुरू असलेली कामे तसेच आगामी काळात प्रस्तावित विविध विकास प्रकल्पांची सविस्तर माहिती यावेळी मांडण्यात आली.

वाढत्या विकास गरजा लक्षात घेता पायाभूत सुविधा, पर्यटन विकास, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण रस्ते व जलसंधारण यांसारख्या क्षेत्रांसाठी जिल्हा नियोजन निधीत भरीव तरतूद करण्याची मागणी राणे यांनी केली. प्रस्तावित निधीमुळे प्रलंबित कामांना गती मिळून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बैठकीस मंत्री उदय सामंत, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जैसवाल, आमदार दीपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवींद्र खेबूडकर तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा