You are currently viewing जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

*जिल्हाधिकाऱ्यांची मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष पाहणी*

 

सिंधुदुर्गनगरी :

जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या शनिवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार असून, निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे.

या अनुषंगाने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सावंतवाडी येथील मतदान पथके मतदान केंद्रांवर रवाना करण्याबाबत आढावा घेतला. तसेच सखी मतदान केंद्र असलेल्या जिल्हा परिषद शाळा क्रमांक २, धवडकी व आदर्श मतदान केंद्र, जिल्हा परिषद शाळा, माझगाव येथे भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. मतदान प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी उपविभागीय अधिकारी सचिन घारे व तहसीलदार श्रीधर पाटील उपस्थित होते.

दरम्यान, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दोडामार्ग तालुक्यातील सखी मतदान केंद्र, झरे १ येथेही भेट देऊन व्यवस्थेची तपासणी केली. महिला मतदारांसाठी सुरक्षित व सुलभ वातावरण उपलब्ध करून देण्यावर त्यांनी विशेष भर दिला. या भेटीवेळी तहसीलदार श्रीमती राजमाने उपस्थित होत्या.

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय व शांततेत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असून मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा