आंबा बागायतदारांच्या समस्या सोडवा, शेतकरी बागायतदार संघाचे पालकमंत्री ना .नितेश राणे यांना साकडे
देवगड :
देवगड तालुक्यात आंबा पिकावर आलेल्या गंभीर अरिष्टाच्या पार्श्वभूमीवर आंबा व इतर फळ बागायती शेतकरी संघ, देवगड यांच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री तथा मत्स्य व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांची भेट घेऊन सध्याची भीषण परिस्थिती मांडली. यावेळी आंबा उत्पादनावर झालेल्या परिणामाची सविस्तर माहिती देत शेतकऱ्यांना तातडीच्या दिलासादायक उपाययोजनांची मागणी करण्यात आली.
हे निवेदन संघटनेचे अध्यक्ष विलास रूमडे यांच्या नेतृत्वाखाली आंबा बागायतदारांनी पालकमंत्री नामदार नितेश राणे यांची भेट घेऊन दिले.
नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात आंबा कलमांना मोठ्या प्रमाणात मोहोर आल्याने यंदा भरघोस उत्पादनाची अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र मोहोरासोबत पालवीही मोठ्या प्रमाणात आल्याने तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव वाढला. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकरी-बागायतदारांनी मोठ्या खर्चाने फवारण्या केल्या.
दरम्यान, अचानक वाढलेल्या थंडीमुळे कमाल व किमान तापमानातील फरक १० अंशांपेक्षा अधिक राहिला. त्यामुळे संयुक्त फुलांचे प्रमाण कमी झाले तर नरफुले अधिक राहिली. परिणामी फळधारणा जवळजवळ न झाल्यासारखी असून जी थोडीफार झाली आहे तीही झाडांच्या टोकावर असल्याने ती बेभरवशाची असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
यातच गळून गेलेल्या मोहोरावर पुनर्मोहोर येत असताना त्यावर थ्रीप्स (फुलकीड) किडीचा तीव्र प्रादुर्भाव झाला आहे. या किडीवर अद्याप कोणताही ठोस उपाय उपलब्ध नसल्याने उरलेली थोडीफार आशाही संपुष्टात येण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
फवारण्या, मजुरी, कीटकनाशके व इतर निविष्ठांवरील खर्च मोठ्या प्रमाणात वाढून तो शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. मागील दहा वर्षांतील ही सर्वात गंभीर परिस्थिती असल्याचे सांगत या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शासनाने वेळीच आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी कळकळीची मागणी शेतकरी संघाच्या वतीने अध्यक्ष विलास रूमडे यांनी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
