You are currently viewing शिक्षक नियुक्तीसाठी १७ रोजी धरणे आंदोलन

शिक्षक नियुक्तीसाठी १७ रोजी धरणे आंदोलन

उद्धव ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांचा इशारा:जिल्हा परिषद प्रशासनाला दिले निवेदन

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शून्य शिक्षकी सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये १५ जुलै पर्यंत शिक्षक नियुक्त न झाल्यास १७ जुलै रोजी जिल्हा परिषद कार्यालय समोर तीव्र धरणे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी जिल्हा परिषद प्रशासनास दिला आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज जिल्हाप्रमुख संजय पडते ,अतुल बंगे, राजू गवंडे ,यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर,व शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांची भेट घेत शिक्षक नियुक्ती बाबत निवेदन सादर केले आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, काही दिवसापूर्वीच खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक, यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाच्या शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदली प्रक्रियेमुळे जिल्ह्यात शंभरहून अधिक शाळा शून्य शिक्षकी झाल्या आहेत. त्या शाळेतील मुलांचे नुकसान होऊ नये यासाठी शिक्षक उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी केली होती. यावेळी ७ दिवसात मानधन तत्वावर शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. परंतु अद्याप पर्यंत या शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध झालेले नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तरी येत्या १५ जुलै पर्यंत जिल्ह्यातील शुन्य शिक्षकी सर्व शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध करून न दिल्यास १७ जुलै रोजी जिल्हा परिषद कार्यालयसमोर तीव्र धरणे आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा जिल्हाध्यक्ष संजय पड़ते यांनी दिला आहे.याबाबत आज जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी याना निवेदन दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा