You are currently viewing अनुबंध
Oplus_16908288

अनुबंध

*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी विगसा यांच्या “अनुबंध” या काव्यरचनेचे विनय पारखी ( मुंबई ) यांनी केलेले रसग्रहण*

 

*अनुबंध*

〰️〰️〰️

खरे आधीच कळायला होते

जन्मताच दुरावा भाळी होता

 

जाहली परवड मनभावनांची

म्हणावे आता दैवयोग होता

 

उरले केवळ मौनात मुसमुसणे

पारावर बकुळ साक्षीला होता

 

सारे सारे ओघळ आठवांचे

माहोल सारा डहूळला होता

 

विषण्णतेतही काव्य उमलते

हाच अंतरी साक्षात्कार होता

 

नभाला अनुबंध अव्यक्ताचे

जीवात्मा त्यात गुंतलेला होता

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

*@विगसा*

 

“*अनुबंध* ” म्हणजे नंतर तयार झालेला ऋणानुबंध किंवा जिव्हाळा. आपले जन्म-मरण आपल्या हातात नसते. आपण जन्माला आल्यानंतर तयार झालेले ऋणानुबंध म्हणजे ‘अनुबंध’. मग ते अनुबंध आपल्या प्रारब्धामुळे किंवा आपल्या नशिबामुळे तयार झालेले असतील. अशाच एका अनुबंधाचे वर्णन कवी विगसा आपल्या या गझले मध्ये करतात.

 

कधीकधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून सोडतं की त्यावेळी आपल्याला जाणवतं ही तयार झालेली नाती फक्त ऋणानुबंधाची आहेत. ती त्यावेळेच्या परिस्थितीनुसार तयार झालेली आहेत. ती नाती मुळात आपल्या नशिबी होती का ? असा प्रश्न कवीला पडतो आणि त्याच उत्तरही तोच देतो की अश्या नात्यांचा कदाचित दुरावाचा आपल्या नशिबी जन्मापासून लिहिला असावा. ज्याप्रमाणे एका सुंदर वासाच्या गुलाबाच्या नशिबी काट्यांचे फास असतात किंवा केवढयाच्या नशिबी नागांचे श्वास असतात तसाच तर हा दुरावा माझ्याभाळी जन्मजात लिहिला तर नसेल ना ? याचे उत्तर देताना कवी म्हणतो ज्यावेळी मनभावनांची फरफट होते त्यावेळी आपण आपल्या नशिबालाच कोसतो आणि स्वतःच सांत्वन स्वतः करण्याचा प्रयत्न करतो. अशावेळी प्रामुख्याने आठवण येते ती त्यावेळी आपल्या साथीला असलेल्या त्या ‘पारावरच्या बकुळीची’ कारण विरह वेदना ह्या नेहमी मुकच असतात. त्या मनात मुसमुसून रडत असतात. त्या फक्त आपल्या सोबतीला त्यावेळी जो कोणी असेल त्यालाच कळतात. आपल्या नशिबी फक्त आठवांचे ओघळ असतात.

 

सर्जनशीलता म्हणजे काय त्याच उत्तम उदाहरण म्हणजे विगसा सरांची ही ओळ “विषण्णतेतही काव्य उमलते, हाच अंतरी साक्षात्कार होता” अशा नशिबात नसलेल्या ऋणानुबंध यावर अशा मानसिकतेमध्ये असताना जे शब्द लिहिले जातात ते शब्द केवळ कविता असत नाही तर तो असतो काळजातील वेदनेचा मांडलेला प्रवास. तो असतो आलेला साक्षात दुःखद अनुभव. अशा अनुभवाने संपन्न झालेला जीवात्मा मग विसावा शोधतो तो फक्त अव्यक्तापाशी. कारण त्या ईश्वराचं आणि या जीवात्म्याचं नातं आभाळा एवढं असतं . असा हा जो अनुबंध असतो त्याच्या आणि आपल्या नात्यातला ते कळायला आपल्याला आपलं बरंच आयुष्य खर्ची घालावं लागतं. कारण दुःखात विरहात होरपळल्याशिवाय त्याच्या त्या अतूट नात्याची किंमत आपल्याला कळत नाही.

 

विगसा सरांची ही गझल एकीकडे प्रेमात झालेला विरह दर्शवते. मग ते प्रेम कोणाचं का असेना. तर एकीकडे ईश्वराच्या नात्याशी जोडला गेलेला अनुबंध आपल्या समोर प्रकट करते. या एकाच गझलेत सरांनी प्रेम, विरह आणि तवज्ञान सांगितले आहे. कारण गझलेचा पायाच प्रेम आहे. त्यात भेटीची ओढ, लागलेली आस, मिलनाचा आनंद आहे. प्रेमात दुरावा आहे कारण तिथे मुसमुसणे, परवड होणे , बकुळ असे शब्द वापरले आहेत आणि त्या विरहाच्या वेदनेतून झालेला साक्षात्कार म्हणजेच आलेल्या दुःखाला सत्य मानून त्याकडे डोळसपणे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा याविषयी तत्वज्ञान सांगितले आहे.

थोडक्यात मराठी वर्णमालेनुसार ‘अ’ अज्ञान प्रथम येते आणि ‘ज्ञ’ ज्ञान सर्वात शेवटी प्राप्त होते.

 

*© विनय पारखी.*

प्रतिक्रिया व्यक्त करा