कणकवली / तळेरे:
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट),सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने वीरगाथा प्रकल्प–५.0 अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,तळेरे येथील दोन विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले आहे.
नववी ते दहावी गटातून कु.श्रावणी दीपक पांचाळ हिने तर अकरावी ते बारावी गटातून कु. समीक्षा संतोष पाटणकर हिने चित्रकला स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला.
विशेष गौरवाची बाब म्हणजे या दोन्ही विद्यार्थिनींचा प्रजासत्ताक दिनानिमित्त डायटचे प्राचार्य राजेंद्र कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या यशाबद्दल प्रशालेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी मनोगतात सांगितले की, विद्यार्थ्यांनी मेहनत, चिकाटी आणि सर्जनशीलतेच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो. शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण तयारी यामुळेच हे यश शक्य झाले. शाळा केवळ शैक्षणिकच नव्हे तर सांस्कृतिक व कलात्मक विकासासाठीही नेहमी प्रयत्नशील आहे.भविष्यातही विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये असेच उज्ज्वल यश मिळवतील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मनोगत व्यक्त करून विद्यार्थिनींचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या विद्यार्थिनींना प्रशालेचे कलाशिक्षक पी.एन.काणेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण खटावकर,सर्व शाळा समिती सदस्य,शिक्षकवृंद, माजी व आजी विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थ यांनी विद्यार्थिनींचे व प्रशालेचे विशेष कौतुक केले.
