वेंगुर्ले :
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (उबाठा) पक्षाचे वेंगुर्ले तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्याकडे सादर केला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असतानाच हा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राजीनामा पत्रात यशवंत परब यांनी नमूद केले आहे की, ते गेली सहा वर्षे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे वेंगुर्ले तालुका प्रमुख म्हणून कार्यरत होते. मात्र वैयक्तिक कारणांमुळे पक्षाच्या कामासाठी अपेक्षित वेळ देता येत नसल्याने आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सदर राजीनामा मंजूर करावा, अशी विनंतीही त्यांनी पत्रात केली आहे.
या अचानक घडामोडीमुळे वेंगुर्ले तालुक्यातील उबाठा सेनेच्या राजकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.
