You are currently viewing प्रवासी महासंघाच्या जिल्हाध्यक्ष पदी तेजस साळुंखे यांची निवड

प्रवासी महासंघाच्या जिल्हाध्यक्ष पदी तेजस साळुंखे यांची निवड

वैभववाडी
महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी तेजस साळुंखे तर जिल्हा संघटकपदी श्री.जितेंद्र पिसे यांची निवड झाली आहे. ही संघटना प्रवासी ग्राहकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी १९८९ पासून राज्यात कार्यरत आहे. या संघटनेच्या माध्यमातून प्रवासी ग्राहकांचे प्रबोधन करण्याबरोबरच समस्यांचे निराकरणही केले जाते. अशा या राज्यव्यापी कार्यरत असणाऱ्या संघटनेची राज्यव्यापी ऑनलाईन बैठक नुकतीच संपन्न झाली.
प्रवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहा विभागातील एकूण २६ जिल्ह्याच्या अध्यक्ष आणि संघटक पदांची निवड जाहीर करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रवासी महासंघाचे राज्याध्यक्ष श्री. रणजीत श्रीगोड, प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड उपस्थित होते. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र आणि महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ या दोन्ही संघटना ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांनी स्थापन केलेल्या असून त्या दोन्ही सहयोगी संघटना असल्याचे डॉ.विजय लाड यांनी सांगितले.

यावेळी प्रवासी महासंघाचे उपाध्यक्ष श्री.अरुण वाघमारे, संघटिका मेघाताई कुलकर्णी, अध्यक्ष श्री.रणजित श्रीगोड यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत सागर रणदिवे यांनी केले. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन राज्याचे सचिव प्रा.गुरूनाथ बहिरट यांनी केले तर आभार प्रदर्शन विनोद बापट यांनी केले. यावेळी महाराष्ट्रातील २६ जिल्ह्याच्या अध्यक्ष आणि संघटक पदाच्या नियुक्त्या अध्यक्ष रणजित श्रीगोड, उपाध्यक्ष अरुण वाघमारे, महासचिव नंदकुमार कोरे व सचिव प्रा.गुरुनाथ बहिरट यांनी जाहीर केल्या आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री. तेजस प्रकाश साळुंके-वैभववाडी यांची अध्यक्षपदी आणि संघटकपदी श्री. जितेंद्र वसंत पिसे-देवगड यांची निवड एकमताने करण्यात आली.

या बैठकीस ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे संघटक सर्जेराव जाधव, सदस्य प्रमोद कुलकर्णी, श्यामकांत पात्रीकर, कल्पना तिवारी आदी मान्यवरांसह महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यातील सर्व नवनियुक्त अध्यक्ष आणि संघटक उपस्थित होते. या निवडीबद्दल ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा.श्री. एस. एन. पाटील, उपाध्यक्ष श्री. एकनाथ गावडे, संघटक श्री.सिताराम कुडतरकर व सचिव श्री.संदेश तुळसणकर यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + 13 =