You are currently viewing शिस्तीचे जिवनातील महत्त्व
Oplus_16908288

शिस्तीचे जिवनातील महत्त्व

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*शिस्तीचे जिवनातील महत्त्व*

 

सुमारे ८०वर्षापूर्वी समाजात नोकरी, घरसंसार व मुलंबाळं याखेरिज सर्वसाधारण नितीमान चारित्र्यवान लोकांना फारसा बाहेर वेळ घालवणं आवडत नव्हते.

तेव्हाही जुगार, पत्ते दारू लफडी इ. व्यसने होती पण फारच अपवादात्मक संसारी गृहस्थ तिकडे वळत. बाकी आपण व आपली नोकरी, घर मुलं इ. बरं असं समजण्यार्यांपैकी असत.

त्यावेळी घरात वडिल, आजोबा, मोठे काका यांचा एकत्र कुटूंबात फार दरारा व धाक असे. घरातली सगळीच मंडळी यांना घाबरून असत.

त्यामुळे संपूर्ण घरावर शिस्त व वळण पसरलेले असे.

अगदी लहानपणापासुन मायेने चांगले वळण व शिस्त शिकवले जाई. दोन चार वेळा सांगितले जाई. नाहीच ऐकले तर सौम्य का होईना पण शिक्षा होत असे. सहजच मुलांना शिस्त हेच जिवन हा धडा मिळत असे.

मोठ्यांचा धाकच इतका असे कि, ऐकले नाही असं होतच नसे.

दिवसभर आई व मुले घरातच असत फक्त शाळेचा वेळ सोडून. घरीच स्वाध्याय, नविन वेगळे पुस्तक वाचन, आपल्या वस्तू निटनेटक्या ठेवणे, स्वच्छता पाळणे इ. केले जायचे. संध्याकाळी मुले मैदानात मैदानी खेळ खेळत. ज्यात छान व्यायाम होई.

मुले एकत्र व मिळुन खेळत. भांडणे वाद होत पण तिथल्यातिथे मिटवली जात. घरी जात नसत.

यातुनच एक ऊत्कृष्ट अशी जिवनसरणी अवलंबली जात असे. आपोआपच शिस्त व वळण लागत असे.

घरोघरी नोकरीवरून आलेले वडील मुलांबरोबर बसत.

वडिल यायच्या वेळीआम्ही मुले घरी परतत हात पाय धुऊन अभ्यासाला बसायचो.

वडिलांचे आटपले कि, ते आमच्याकडुन पाढे, पावकी, निमकी, अडिचकी इ. म्हणुन घेत‌. कधी कविता म्हणायची तर कधी धडावाचन आळीपाळीने असे. संयुक्त कुटूंबात असे वडिलधारी मुलांच्यात जातीने लक्ष घालत.

अभ्यासातलं काही अडलेलं विचारायचं मग बाबा ते छान समजुन सांगत. कळलं कि नाही हे पण ते तपासत. मला जे येत नाही ते माझे बाबा मला येईपर्यंत छान समजावतील…. हा विश्वास होता . त्यामुळे गणित इंग्रजी अशा विषयांची कधी भिती वाटली नाही, आणि अशावेळी बाबा अगदी आपलेच वाटत. भिती पळून जाई.

यानंतर ते रामायण, महाभारत, त्याकाळातल्या बुद्धीमान स्त्रिया, काही क्रांतीकारक, स्वातंत्र्य सैनिक, समाजसेवक, श्रीकृष्णाची गीता इ. मधले महत्वाचे भाग असे रंगुन सांगत . ज्यात आम्ही पूर्ण दंग होत असूं.

यातुन महत्वाच्या कृती, निर्णय, संदेश, इ. मनावर ठसत असे.

जेवताना सगळे शिजवलेले खाल्ले पाहिजे, टाकायचे नाहीच, खाली सांडायचे नाही , जेवताना नको ते विषय काढायचे नाहीत इ. शिस्त असे.

रामरक्षा, मारूती स्तोत्र म्हणत पेंग यायची.

ऊठल्यावर परत सर्व घरावर या मोठ्यांची शिस्त परत पसरे व बाबांची भिती वाटे.

शाळेतही वर्गात फालतुपणा, मस्करी अजिबात नव्हती. नैतिकतेवर आधारित शिक्षण, शिस्त, व अभ्यास चाले.

चुकलं तर पट्टी बसेच. ओरडा तरी निदान बसे.

शिक्षकांची शाळेत भिती वाटे.

आसपास रहाणारे काही हौशी संध्याकाळी मुलींसाठी समिती व मुलांसाठी शाखा असे. तिथे नित्य नेमे व्यायाम, शिस्तबद्ध प्रार्थना व मैदानी खेळ योग्य रितीने चालत.

ठराविक खाऊ त्या त्या सणांना पोटभर मिळे. विकत आणणे, मागवणे इ. कूठेच नसे.

पोषाख हा अंग झाकण्यासाठी असतो हे वळण असे. केस नीट बांधायचे असतात ही शाळेत शिस्त असे

नखे , केस कापणे इ. कडक तपासणी असे.

एकंदर पहाता आम्ही मुले शिस्तीच्या एका मुशीतुन बाहेर पडत असूं.

वळण व शिस्त रक्तातच भिनत असे. मन कोणत्याही प्रसंगासाठी तयार असे.

मुले शिक्षणासाठी व नोकरीसाठी , आणि मुली सासरी जाणार तेव्हा त्यांच्या ऊपयोगी पडेल असा हा शिस्त व‌ळण यांच्या संस्कारांचा एक कल्पवृक्षच आईवडिल मुलांच्या अंतरात रूजवत.

या कठोर पण मायेने लावलेल्या शिस्तीचे महत्व आज कळते.

मुले स्वत:निर्णय सहज घेऊ शकत, स्वयं शिस्त पाळल्यामुळे कूठेही राहू शकत, मन खंबीर होई. आपली लढाई आपणच लढायची हे समजले होते. कूठे पाऊल जोषात टाकायचं व कूठे एक पाऊलाची माघार घ्यायची हे अंगवळणी पडलं.संघर्षासाठी मन सतत सज्ज असायचं.

नोकरीत, नैतिकतेने वागायचं शिकवल्यामुळे परस्त्रीला आदराने सन्मान देणे, मोठ्यांशी आदराने वागणे, समोरच्याचा मान राखणे, भ्रष्टाचाराचा ऊच्चारही न करणे, शक्य तो इतरांच्या ऊपयोगी पडणे, आहे त्यात ईर्षा ,लोभ, मोह, अति महत्वाकांक्षा व दुराभिमान न बाळगता समाधानी रहाणे. स्वच्छता, टापटिप ठेवणे हे सारे संस्कार त्या शिस्तीतुनच अंगवळणी पडले. अपवाद सोडले तर फारशी श्रीमंती, महागड्या गाड्या, दुचाकी, अंगप्रदर्शन करणारे पोषाख, अचकट विचकट बोलणे, हवे ते हवे तेव्हा खाणे इ. करावे असं मनातच आलं नाही. हाच शिस्तीचा फायदा व महत्व ठरले.

कधी एकटं वाटलं नाही, तडजोड, माघारीची संवय असल्याने नैराश्य आले नाही. ऊलट यश अपयश सहज पचवले गेले.

नैराश्य , स्त्रीवरचे अत्याचार हे शब्दच ऐकले नव्हते.

नैतिकता आपोआप रक्तात मिसळायची आणि वाईट गोष्टी व्हायच्या नाहीत.

असा हा संस्कारांचा कल्पवृक्ष केवळ शिस्त, वळण, मोठ्यांचे जातीने घरात लक्ष यामुळे मनी कायमचा रूजवला गेला हे महत्व आज समजतंय.

आज स्त्रीचे शिक्षण, अर्थार्जन, समान हक्क, इ. चा अतिरेक झालाय. स्वैराचार होऊ लागलाय. सिनेमा, मोबाईल, रील्स वेबसेरीज यांचे समाजाला व्यसन लागले आहे. अति लोभ महत्वाकांक्षेमुळे भ्रष्टाचार बोकाळलाय. मूले पाळणाघरात वाढतात, शाळेपेक्षा क्लास छंदवर्ग यांना महत्व आले. शिक्षकांची टिंगल होते. वडील म्हणजे अगदी जवळचा मित्र म्हणुन चूकीचे वळण लागत आहे “ए!बाबा”म्हण्याइतकी मजल गेली आहे. कूठेच धाक शिस्त वळण ऊरले नाही . खरं तर त्याला महत्वच दिले जात नाही.

छोटी कुटूंबे, आजी आजोबा गांवी, नाते संबध दुरावलेत, स्वतंत्र विचार सरणी, मुलांचे सगळेच नको इतके लाड हट्ट पुरवणे या विचार बदलांमुळे मुले बेफाम, बेमुर्वत झाली आहेत. अपवाद सोडल्यास भावा बहिणींशीही पटत नाही. आईबाबांना मान नाही नैतिकता तर पळुनच गेली हे सारे चाळे बघुन.

यात तोटा मात्र समाजाचा होतोय.

मुले आक्रमक होत हाती शस्त्रे धरतात, खुन‌अगदी घरच्यांचे सुद्धा करतात, चोरी, स्त्रीअत्याचार तर सहजसुलभ होत आहेत. व्यसने गुन्हे इ. चे बळी ठरत आहेत. निर्णय घेता येत नाहीत तडजोड जमत नाही अपयश यश पचवता येत नाही. एकटेपणा वाढतो मग नैराश्येचे बळी होतात. आत्महत्या, घटस्फोट, खून वाढतच आहेत.

लग्न न करता रहाणे, मूले होऊ न देणे असे अविचार धुमाकूळ घालत आहेत.

या सर्वाच्या मुळाशी गेलं तर शिस्त, वळण व त्याबरोबर येणारी नैतिकता, विवेक हे नाहीसे झाले त्याचाच हा परिणाम आहे हे लगेच समजते. समजते पण वळत नाही हेच खरे.

शिस्त, पशू पक्षी व वनस्पती यांच्यातही पाळली जाते. त्यांना महत्व कळतं मग आम्हाला का नाही?

मानव बुद्धीवंत आहे म्हणुन अति शहाणा झालाय?

 

अनुराधा जोशी.

F 3 /404

विजयनगर सहवास. नित्यानंद मार्ग (सहाररोड)

अंधेरी पूर्व. मुं. ६९

मो. 9820023605

प्रतिक्रिया व्यक्त करा