जिल्ह्यात ३३ समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम
१ हजार ७७९ किलो कचरा संकलित
सिंधुदुर्गनगरी
स्वच्छ समुद्र किनारे हा जिल्ह्याचा आरसा आहे. आपला जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने जिल्ह्याल येणारे देशी- विदेशी पर्यटक हे समुद्र किनारी मोठ्याप्रमाणात भेटी देतात. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना आपण जर स्वच्छ व सुंदर समुद्र किनारे देऊ शकलो तर भविष्यात यापेक्षाही मोठ्याप्रमाणात पर्यटक जिल्ह्याला भेटी देतील असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी जिल्हास्तरीय समुद्र किनारा स्वच्छता कार्यक्रमांच्या उद्घाटन प्रसगी व्यक्त केला.
स्वच्छ भारत मिशन (ग्रा) व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून दिनांक 01 जानेवारी 2026 रोजी श्रमदानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व समुद्र किनारे स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांचा शुभारंभ ग्रामपंचायत मेढा ता. वेंगुर्ला येथे करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमांस, मेढा ग्रामपंचायत सरपंच अवधुत रेगे, वेंगुर्ला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, जिल्हा परिषद कृषी अधिकारी दिंगशांत कोळप, जिल्हा पाणी व स्वच्छता जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सतोष पाटील, मेढ़ा ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे, श्री. रुपाजी किनळेकर, श्री. मनिष पडेत, श्रीम स्नेहल पिंगुळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व समुद्र किनारे स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील सर्वच 33 समुद्र किनारी स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये एकुण 1 हजार 779 किलो कचरा गोळा करण्यात आला आहे. देवगड तालुक्यातील 13 समुद्र किनारी 403 जनांच्या उपस्थितीत 500 किलो कचरा एकत्र करण्यात आला. तर मालवण तालुक्यात 163 जनाच्या उपस्थितीत 9 समुद्र किनारे स्वच्छ करण्यात आले असुन 923 किलो कचरा जमा करण्यात आला आहे. वेंगुर्ला तालुक्यातील 11 समुद्र किनाऱ्याच्या स्वच्छतेकरीता 337 लोंकानी पुढाकार घेत 356 किलो कचरा गोळा केला आहे. जिल्ह्यातील 33 समुद्र किनाऱ्याच्या स्वच्छता कार्यक्रमांत एकुण 1 हजार 35 किलो प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला आहे. सदर कचऱ्याच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून योग्य विल्हेवाट लावण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी दिली आहे.
