You are currently viewing सावंतवाडी नगरपालिकेचे आरोग्यदृष्ट्या महत्त्वाचे पाऊल…..

सावंतवाडी नगरपालिकेचे आरोग्यदृष्ट्या महत्त्वाचे पाऊल…..

पाण्याच्या टाक्या साफ करण्यासाठी चकाचक उपक्रम

नगरपालिका, भगीरथ प्रतिष्ठान, रोटरी क्लब व क्रेडाई यांचा सहयोग

सावंतवाडी
शहरातील सोसायटींच्या पाणी साठवणुकीच्या टाकीमध्ये गाळ साठत असतो. अशावेळी इमारती वर चढून नक्की टाकीची स्वच्छता किती आहे हे पाहिले जात नाही. अस्वच्छता वाढल्यावर पर्यायाने आरोग्य बिघडते यासाठीच या सर्व साठवणुकीच्या टाक्यांची सफाई करण्याची गरज जाणवल्यामुळे सावंतवाडी नगरपालिका क्षेत्रात नगरपालिका, भगीरथ प्रतिष्ठान, रोटरी क्लब व क्रेडाई यांचा सहयोगाने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी या उपक्रमासाठी आरोग्य दूत म्हणून काम करणारे प्रशिक्षित कर्मचारी विजय लाखे व दीपक लाखे यांना चकाचक स्वच्छता कीटचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर पाणीपुरवठा सभापती उदय नाईक नगरसेवक आनंद नेवगी भगीरथ भगीरथ प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. डॉक्टर राजेश नवांगुळ, सचिव दिलीप म्हापसेकर, क्रेडाईचे संचालक उदय पारळे व शरद सावंत आदी उपस्थित होते.

नगरपालिकेच्या या चकाचक उपक्रमासाठी लाखे वस्तीतील या तरुणांनी पुणे येथे जाऊन पाण्याच्या टाक्या साफ करण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. हे काम सावंतवाडी नगरपालिकाक्षेत्रात करण्यासाठी त्यांना यासाठी लागणारी उपकरणे दिली असून वर्षातून दोनवेळा पाण्याच्या टाक्या साफ करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

यासाठी नगरपालिका प्रशासन दरपत्रक निश्चित करेल. सदर उपक्रमामुळे पाण्याची गुणवत्ता सुधारली जाईल.
नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या चकाचक उपक्रमासाठी भगीरथ प्रतिष्ठान रोटरी क्लब व क्रेडाई यांनी सावंतवाडी नगरपालिकेचा विचार केला त्याबद्दल पालिकेच्या वतीने आपण त्यांचा आभारी आहे. या उपक्रमासाठी या संस्थांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. तसेच भविष्यातही सामाजिक संस्थांनी अशा उपक्रमांसाठी पुढे यावे त्यासाठी नगरपालिका नक्कीच त्यांच्या सोबत राहील अशी ग्वाही नगराध्यक्ष संजू परब यांनी यावेळी दिली. तसेच आपल्या सोसायटीची पाण्याची टाकी साफ करण्याची इच्छा असूनही कुशल मनुष्यबळ नसल्यामुळे टाक्या साफ होऊ शकत नाहीत. त्यामूळे सावंतबाडी नगरपालिकेच्या क्षेत्रातील सोसायटी अध्यक्षांनी व रहिवाशांनी या प्रकल्पासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले.

कोकणी माणसाचे स्वच्छतेवर प्रचंड प्रेम आहे. परिसर सफाईतून होणारे श्रमदान व त्यातून मिळणारा आनंद आपण घेत असतो. घरातील महिला स्वयंपाकाची भांडी घासल्यानंतर येणारी चकाकी यावरून हा चकाचक’ उपक्रम सुरु होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्याची काळजी घेणारा हा प्रकल्प नाविन्यपूर्ण आहे. ग्रामपंचायत स्तरावरपण अशाप्रकारच्या उपक्रमांची गरज आहे. यातून जनतेचे आरोग्य सुधारेल व रोजगार निर्मितीही होईल हा हेतू ‘चकाचक मध्ये आहे, असे यावेळी डॉ. प्रसाद देवधर यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा