चिन्या

गँगस्टरच्या जीवनावर आधारित शॉर्टफिल्म

♦झगमगत्या दुनियेतील आभासी जीवनाकडे तरुण मुलांचा पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यातून लागलेली वाईट संगत, संगतीतून गैरमार्गाकडे झुकणे, गैरमार्गातून येणाऱ्या पैशाचं वाटणारं आकर्षण…..
आपल्याकडेही असाच पैसा असावा, फिरायला आरामदायी गाडी असावी…. अशा एक ना अनेक इच्छा मनात उत्पन्न होतात. आणि असे गैरमार्गाने येणाऱ्या पैशांकडे आकर्षित होणारे तरुण नादी लागतात ते व्यसनांच्या.

♦व्यसनात बुडालेले सर्वसामान्य घरातील ऐन तारुण्यात पाय ठेवणारे तरुण व्यसनांसाठी पैसा कमी पडू लागल्यावर पाय ठेवतात ते गुन्हेगारी दुनियेत. अशा हव्यासी नवनवीन तरुणांच्या शोधातही गुन्हेगारी जगतातील आसामी नेहमीच असतात. त्यांना गुन्हा करून पचवून जाण्यासाठी गरज असते ती न ओळखू येणाऱ्या नव्या चेहऱ्यांची.

♦अंमली पदार्थांची तस्करी असो वा अवैध्य दारूचा धंदा असो. गाड्यांवर ड्राइवर, गाड्या सुरक्षित पोचविण्यासाठी गाडीच्या पुढे काही किलोमीटरवर दुचाकीने पायलटिंग असो. किंवा दारू ओढण्याचा गाडीत एकटा ड्राइव्हर रोज दिसला तर संशय येऊ नये म्हणून ही कोवळी पोरं प्रवासी म्हणून असो, वा सुपारी घेऊन एखाद्याचा गेम करायचा असेल तर नवखा तरुण गेम बजावून गेला तरी ओळख होऊ नये म्हणून आणि गेम चुकलाच तर त्या नवख्या तरुणाचाच गेम करता यावा म्हणून असो. एकदा का गुन्हेगारीच्या जगात १५/१६ वर्षांच्या कोवळ्या पोरांनी पाय ठेवला की त्यांना मागे फिरणे अशक्य असते. कारण त्या गुन्हेगारी जगाची माहिती बाहेर पडल्यावर त्यांनी पोलीस अथवा सक्षम यंत्रणेस देऊ नये म्हणून त्यांचा शेवट करणे हाच पर्याय असतो. सावंतवाडीतील कित्येक तरुण कोवळी मुलेही झटपट कमी श्रमात अधिक पैसा यामुळे दारूच्या धंद्यात ओढली गेली आहेत. अशा अनेक मुलांनी बोध घेण्यासारखी आहे ही शॉर्टफिल्म.

♦अवैध्य धंद्यात, गुन्हेगारी जगतात सर्वसामान्य तरुण उतरले की त्यांचं आयुष्य कसं बदलतं, गुन्हेगारीचे झगमगते जग कसं असतं, त्यातला पैसा टिकतो की स्वतःच्या आयुष्यासोबतच संपतो. हेच या गँगस्टरच्या जीवनावरील आधारित शॉर्टफिल्म मधून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

♦मूळ सावंतवाडीतील इन्सुली गावातील तरुण व्यावसायिक आस्वाद अरविंद पेडणेकर यांच्या या शॉर्टफिल्म मधून चिन्या या सर्वसामान्य कुटुंबातील १७/१८ वर्षांच्या मुलाची ही कथा आहे. नवीन नोकरी लागली असं घरात खोटं सांगून बाहेर गुन्हेगारीच्या दुनियेत पाऊल ठेवून आयुष्यात पहिल्यांदाच चुकीचे काम करताना त्याच्याकडून झालेली अक्षम्य चूक….आणि त्या चुकीमुळे त्याच्या स्वतःच्या अनमोल आयुष्याचं काय होतं? त्याच्या कुटुंबाचं काय होतं? हे दाखविण्याचाच प्रयत्न या शॉर्टफिल्म मधून केलेला असून, तरुणांनी यातून बोध घेऊन गँगस्टर, अवैध्य धंदेवाले यांच्या नादी लागू नये, झटपट पैशांचा हव्यास करून आपलं आयुष्य बरबाद करू नये हाच संदेश देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे महर्षी प्रोडक्शनच्या फिल्म मधून आस्वाद पेडणेकर यांनी…

♦आपण सर्वांनी जरूर या शॉर्टफिल्मचा आस्वाद घ्यावा, इतरांनाही पाहण्यासाठी शेअर करावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा