व्यावसायिक व स्थानिकांचे हित जपूनच विकास; सर्व प्रश्नांवर सकारात्मक तोडगा
ओरोस :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू व्यवसाय, चिरेखाण व्यावसायिकांचे प्रश्न तसेच वेळागर येथे प्रस्तावित फाईव्ह स्टार ताज हॉटेल प्रकल्पाबाबत जनतेच्या मनात निर्माण झालेल्या शंका-कुशंकांचे निरसन करण्यात आले असून, सर्व प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढला जात आहे, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला.
पालकमंत्री राणे म्हणाले की, वाळू व्यवसायिकांबाबत धोरणात्मक अडचणी होत्या. व्यवसाय करताना त्यांना होणारा त्रास आणि गैरप्रकार यासंदर्भात निलेश राणे यांच्या सूचनेनुसार संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनीही प्रत्यक्ष समस्या जाणून घेतल्या. “हे सर्व व्यावसायिक आपल्या जिल्ह्यातील भूमिपुत्र आहेत. त्यांचा व्यवसाय सुरळीत व्हावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील वाळू प्रश्न, चिरेखाण व्यावसायिकांच्या अडचणी आणि वेळागर येथे ताज समूहाच्या माध्यमातून प्रस्तावित फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पाबाबत स्थानिकांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी बैठका घेण्यात आल्या. या बैठकीनंतर जनतेचे समाधान करून पालकमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी दीपक केसरकर, जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमीसे आदी उपस्थित होते.
शिरोडा–वेळागर येथे ताजच्या माध्यमातून फाईव्ह स्टार हॉटेल उभारणीबाबत स्थानिक रहिवाशांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्यात आली. या बैठकीत स्थानिकांच्या सर्व शंकांचे समाधान करण्यात आले असून, भविष्यातही जनतेला विश्वासात घेऊनच विकास केला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. “प्रत्येकाचे शंका समाधान करून विकासाची कामे पुढे नेणे, हाच आमचा उद्देश आहे,” असे त्यांनी नमूद केले.
चिरेखाण व्यावसायिकांच्या काही समस्या चर्चेअंती मार्गी लावण्यात आल्या. तसेच शेती संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या बंदुकांबाबत नियम शिथिल करण्याची मागणीही मांडण्यात आली. लोकप्रतिनिधी म्हणून जिल्ह्याच्या हिताशी संबंधित विविध विषयांवर येणाऱ्या शिष्टमंडळांना न्याय देण्यासाठीच या बैठका आयोजित करण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी आगामी राजकीय वाटचालीबाबत बोलताना सांगितले की, मुंबई महानगरपालिका तसेच राज्यातील अन्य महापालिकांवर महायुतीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार नेतृत्वाने केला असून, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यानुसार रणनीती ठरवण्यात आली आहे.
