You are currently viewing कोकण कला संस्थेने केला माणूसकीचा दिन साजरा…

कोकण कला संस्थेने केला माणूसकीचा दिन साजरा…

औचित्य “व्हॅलेंटाईन डे” चे; समाजातील तळागाळातील लोकांचा सन्मान….

१४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे, समाजात ह्या दिवसाला घेऊन प्रचंड आकर्षण आहे, त्यामध्ये विशेषतः तरुणाईमध्ये हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो, प्रेमी युगुले एकमेकांना या दिवशी गुलाब पुष्प, चॉकलेट आणि महागड्या भेटवस्तू देऊन हा दिवस दरवर्षी साजरा करतात. कोकण कला व शिक्षण विकास संस्थेने या दिवसाचे औचित्य साधून एक वेगळा उपक्रम राबविला. हा दिवस जर प्रेमाचा दिवस असेल तर समाजपयोगी घटकांना ज्यांना आपुलकीनेही वागवले जात नाही त्यांना धन्यवाद म्हणून साजरा करावा असा विचार संस्थेने मांडला आणि आणि शेकडो कार्यकर्ते, समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी यात हिरीरीने सहभाग घेऊन माणुसकीचा दिवस साजरा केला.
शालेय विद्यार्थी, शिक्षक, वकील, पोलीस, व्यावसायिक, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांनी चॉकलेट आणि गुलाब देऊन माणुसकी जनमानसात रुजवण्यासाठी ‘दिवस माणुसकीचा- प्रेम वाटण्याचा’ या भावनेतून आपल्यासाठी नेहमीच कळत-नकळत मेहनत घेणारे महत्वाचे सहकारी, आपल्या विभागातील वृद्ध नागरिक, पोस्टमन, वॉचमन, सफाई कर्मचारी, पोलीस कर्मचारी, रेल्वे कर्मचारी, रस्त्यावर राहणारी बेघर मुले, प्लास्टिक गोळा करणारे, बस चालक-वाहक, रिक्षावाले आदी यांचे आपापल्या परीने सर्वांनी आभार मानले.
त्याच बरोबर कोकण संस्थेच्या माध्यमातून दादर आणि वडाळा विभागात रस्त्यावर राहणाऱ्या बेघर मुलांना कपडे व खाऊचे वाटप देखील करण्यात आले. अशा या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल संस्थेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा