*राष्ट्रीय ग्राहक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करावा.*
*ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे आवाहन*
वैभववाडी.
२४ डिसेंबर हा दिवस “राष्ट्रीय ग्राहक दिन” म्हणून साजरा केला जातो. हा राष्ट्रीय ग्राहक दिन विविध कार्यक्रम व उपक्रमानी साजरा करावा असे आवाहन ग्राहक केंद्रबिंदू मानून कार्य करणाऱ्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने केले आहे.
भारतात २४ डिसेंबर, १९८६ रोजी स्वतंत्र ग्राहक संरक्षण कायदा पास झाला, तेव्हापासून देशात २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो.
तसेच २४ ते ३० डिसेंबर ग्राहक सप्ताह आणि १६ ते ३० डिसेंबर हा ग्राहक पंधरवडा म्हणून साजरा केला जातो.
भारतातील प्रत्येक व्यक्ती भारताचा नागरिक आहे तशीच ती ग्राहक सुद्धा आहे. ग्राहक संरक्षण कायदा १९८६ आणि नवीन २०१९ नुसार ग्राहकांना विशेष हक्क आणि अधिकार मिळाले आहेत.
ग्राहकाला ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती व्हावी, त्याच्या हक्काचे संवर्धन व्हावे, त्याची फसवणूक होऊ नये, त्याला योग्य आणि वेळेत न्याय मिळाला आणि शोषणमुक्त समाज निर्माण व्हावा यासाठी २४ डिसेंबर “राष्ट्रीय ग्राहक दिन” आणि १५ मार्च रोजी “जागतिक ग्राहक दिन” साजरा केला जातो.
परंतु सर्वसामान्य ग्राहकांना ग्राहक संरक्षण कायदा, ग्राहकाचे हक्क, अधिकार आणि कर्तव्ये याबाबत फारशी माहिती असलेली दिसत नाही. ती माहिती व्हावी ग्राहक राजा सजग व्हावा म्हणून २४ डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन जिल्हा स्तरावर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा पुरवठा विभाग आणि तालुका स्तरावर तहसील कार्यालयात साजरा केला जातो.
भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते व ग्राहक संरक्षण कायद्याचे जनक ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी स्थापित ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्यावतीने ग्राहक जागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, सर्व शाळा, महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम एक औपचारिकता म्हणून साजरा न होता ग्राहक हक्काचा जागर आणि एक उत्सव म्हणून साजरा झाला पाहिजे. या दिनी ग्राहक जागृतीपर मार्गदर्शन, निबंध स्पर्धा, चर्चासत्र, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा, पोस्टर स्पर्धा व प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा, पथनाट्य सादरीकरण व ग्राहक जागृती फेरी इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करुन हा राष्ट्रीय दिन साजरा करण्यात यावा असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, संघटक श्री. विष्णुप्रसाद दळवी व सचिव श्री. संदेश तुळसणकर यांनी केले आहे.
