You are currently viewing बाबा आढाव : जसे दिसले तसे

बाबा आढाव : जसे दिसले तसे

*मिशन आय ए एस, अमरावतीचे प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे लिखित बाबा आढाव यांना आदरांजली*

 

*बाबा आढाव : जसे दिसले तसे* 

 

महाविद्यालयात शिकत असताना बाबा आढाव यांचे एक गाव एक पाणवठा हे पुस्तक वाचले होते आणि तेव्हाच बाबा माझ्या हृदयात जाऊन बसले होते. पुढे त्यांचे सहकारी श्री के.ई. हरिदास हे अमरावतीला विभागीय सहनिबंधक म्हणून आले आणि बाबांचे अमरावतीला येणे जाणे वाढले.

श्री के. ई. हरिदास हे सत्यशोधक समाजाचे काम करीत होते. त्यांच्या अमरावतीच्या कांता नगर मधील सरकारी बंगल्यावर श्री बाबा आढाव आले की आम्ही सगळ्या मित्रमंडळींना एकत्र करीत होतो .बाबा आम्हाला मार्गदर्शन करायचे. इतका मोठा माणूस पण एकदम साधे राहणे आणि साधे जेवणे. कोणत्याही बडेजाव नाही.

मी सत्यशोधक समाजाचा कार्यकर्ता असल्यामुळे त्यांच्या सतत संपर्कात होतो. मला आठवते अहिल्या नगर जिल्ह्यातील सोनईचे आमदार श्री यशवंतराव गडाख यांनी सत्यशोधक समाजाचे एक अधिवेशन त्यांच्या साखर कारखान्यावर घेण्याचे ठरविले होते. त्याची एक रितसर सभा ही सोनईला झाली होती. त्या सभेला मी प्रा.अशोक राणा प्रा. अशोक चोपडे के ई हरिदास नलिनीताई लढके अमरावती वरून गेलो होतो. गडाखांनी संपूर्ण खर्च उचलला होता. सोनईपासून शनिशिंगणापूर फारच जवळ आहे. सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ.श्री नरेंद्र दाभोळकर यांनी संमेलन घोषित झाल्यानंतर वर्तमानपत्राला एक बातमी दिली. बातमीचे शीर्षक होते. चला जाऊ शनिशिंगणापूरला. चोरी करायला. शनी शिंगणापूरच्या घरांना दारे नाहीत आणि म्हणून हे अंधश्रद्धा दूर करण्यासाठी नरेंद्र दाभोळकरांनी तसे विधान दिले होते. आपण चोरी केली तर काही आपल्याला काही विपरीत होते काय हा त्यामागचा उद्देश होता. पण श्री यशवंतराव गडाख यांना ते गैरसोयीची वाटले. कारण की तो त्यांचा मतदारसंघ होता. वातावरण तापले होते. आमच्या चर्चा सुरू होत्या.

तेवढ्यात श्री अमरावतीच्या सुप्रसिद्ध अशा श्री शिवाजी शिक्षण संस्थेने श्री बाबा आढाव व श्री नरेंद्र दाभोळकर यांचा कार्यक्रम अमरावतीला आयोजित केला होता. मला हरिदास साहेबांकडून ही बातमी मिळाली. मी मग रेल्वे स्टेशनवर त्यांना घ्यायला गेलो. श्री शिवाजी सोसायटीतर्फे श्री दिनेश बागल हे घ्यायला आले होते. मी व प्रकाश जोध नावाचे माझे फोटोग्राफर यांनी बडनेरा रेल्वे स्टेशनवरच बाबांचे स्वागत केले. बाबा म्हणाले. आपण सोनईच्या संबंधावर चर्चा करण्यासाठी एक मीटिंग बोलावू या. सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवा. त्याप्रमाणे माझ्या निवासस्थानी श्री शिवाजी शिवाजी सोसायटी मधला कार्यक्रम संपल्यानंतर मीटिंग घेण्याचे ठरले. सगळी सत्यशोधक मंडळी जमली. बाबांची व नरेंद्र दाभोळकरांची वाट पाहणे सुरू होते. बाबांना तसा निरोप गेला. श्री शिवाजी शिक्षण संस्थेने महफिल हॉटेलमध्ये बाबांचे व इतर बऱ्याच लोकांचे तसेच पदाधिकाऱ्यांचे जेवण ठेवले होते. पण बाबा म्हणाले की माझे कार्यकर्ते वाट पाहत आहेत मी जेवण काठोळेंकडेच करेल. माझ्या घराच्या गच्चीवर ही सभा झाली. डॉ.नरेंद्र दाभोळकरांच्या विधानावर चर्चा झाली. आता गडाख संमेलन घेतात की नाही हा प्रश्न निर्माण झाला होता ?कारण की त्यांनी त्यांचा तो मतदार संघ असल्यामुळे मतदार संघामध्ये माझ्या विरोधी वातावरण तयार होऊ नये अशी भूमिका घेतली होती. बाबा व काही कार्यकर्ते माझ्याकडे जेवणार म्हणून सौ.विद्याने त्यांच्यासाठी व कार्यकर्त्यांसाठी जेवण केले होते. पण बाबा येणार म्हणून खूप कार्यकर्ते आले. अर्थातच विद्याने केलेले जेवण कमी पडणार होते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारी सदस्य श्री रामराव मोहोड हे माझ्या घरी उपस्थित होते. त्यांनी ती परिस्थिती पाहिली. लगेच आपली गाडी महफिल हॉटेलमध्ये पाठवली. आणि बाबांबरोबर सर्व लोक जेवण करणार होते ते सर्व जेवण महफिल मधून पार्सल करून माझ्या घरी बोलाविलं. गडाखांची नाराजी लक्षात घेतल्यानंतर ते संमेलन दुसरीकडे म्हणजे श्री मुकुंदराव पाटील यांच्या गावला श्री उत्तमराव पाटील यांच्या सहकार्याने घेण्याचे निश्चित करण्यात आले. सभेला सत्यशोधक समाजाचे तत्कालीन अध्यक्ष श्री फाळके सुप्रसिद्ध समाजसेविका नलिनीताई लढके प्रा. अशोक राणा प्रा.अशोक चोपडे साहेबराव विधळे अरविंद वानखडे अनिल वानखडे प्रा. कविता डवरे प्रा. शोभा रोकडे प्रा.शोभा गायकवाड असे कितीतरी लोक आले होते. श्री शिवाजी सोसायटीने महफिल मधून जेवण पाठविल्यामुळे सर्व कार्यकर्त्यांची जेवणे आमच्याकडेच झाली . बाबांनी मात्र माझ्याकडचेच जेवण घेतले. हॉटेल मधल्या जेवणाला त्यांनी हात देखील लावला नाही.

बाबा अमरावतीला आले की हरिदास साहेबांकडे थांबायचे. हरिदास साहेब शासकीय नोकरीमध्ये अतिउच्च पदावर होते त्यामुळे ते बाबांबरोबर फिरण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवायचे आणि मग मी व बाबा अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत तेथील हमाल बंधूंना भेटायला जात होतो.बाबांची सभा म्हणजे आगळी-वेगळी सभा होती. मी अनेक वेळा ती अनुभवली. आजूबाजूला धान्यांची पोती लागलेली आहेत. आजूबाजूला धान्य विखुरलेले आहे. तिथे सगळे हमाल बंधू बसलेले आहेत. बाबा त्यांच्यासमोर भाषण देत आहेत. भाषण देण्यापूर्वी बाबा एक गीत म्हणायचे व नंतर भाषणाला सुरुवात करायचे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाबांचे दोन कार्यकर्ते होते. त्यातील एक पवार यांचे नाव मला आठवते. अमरावतीच्या हमालांसाठी गृहनिर्माण संस्था तयार करायची कल्पना आमच्या अमरावतीच्या हमाल बांधवांनी तयार केली होती. त्यासाठी बडनेरा कोंडेश्वरजवळील जागा देखील निश्चित केली होती. श्री पवार व त्यांचे सहकारी आम्हाला ती जागा दाखवायला बडनेराडला कोंडेश्वर रोडवर घेऊन गेले. बाबांना ती जागा आवडली. आणि इथे आपल्या बांधवांसाठी लवकरात लवकर घरे बांधायला सुरुवात करा अशी सूचनाही त्यांनी संबंधितांना केली होती.

एक वेळ बाबा आले आणि त्यांना अकोल्याला जायचे होते. त्यांची गाडी व सहकारी सोबत होते. सौ विद्या घरी नव्हती आणि मी त्यांना हॉटेलमध्ये जेवण करायला घेऊन गेलो. वाटते एक साधे हॉटेल दिसले. अमरावतीच्या वसंत टॉकीजच्या समोर होते. साधे भोजनालय होते. बाबांनी गाडी थांबविली. मी बाबांना म्हटले. बाबा हे एकदम साधे हॉटेल आहे. आपण थोड्या बऱ्या हॉटेलमध्ये जेवण करू या. बाबा म्हणाले याच हॉटेलमध्ये जेवण करू. साधे असले तरी चालेल. बाबा गाडीतून उतरले. मी जेवणाची ऑर्डर दिली. जेवण आले. मलाच वाईट वाटले की एवढ्या मोठ्या माणसाला आपण एवढ्या साध्या हॉटेलमध्ये जेवण देत आहोत. पण बाबांनी आनंदाने ते जेवण ग्रहण केले. कोणतीही तक्रार केली नाही आणि पुढे अकोल्याला महादेवराव भुईभारांकडे रवाना झाले.

अमरावतीला ते आले की वीर उत्तमराव मोहिते दौलतराव गोळे व श्रीमती नलिनीताई लढके यांना आवर्जून भेटायला जायचे. मी समन्वयक म्हणून काम करीत होतो. एक वेळ बाबा वर्धा येथे जाऊन माझ्याकडे आले. तत्कालीन मंत्री श्री दत्ता मेघेंकडे त्यांचे व्याख्यान होते. सौ.विद्याने त्यांच्याकडे माझी तक्रार केली. मी स्पर्धा परीक्षेसाठी ठिकठिकाणी भाषणाला जातोय. पण प्रवास खर्च घेत नाही. मानधन घेत नाही. विद्या म्हणाली मला हे योग्य वाटत नाही. बाबा तुम्हीच काहीतरी यांना सांगा. मी बाबांना म्हणालो. मी परवाच दत्ता मेघेंकडे जाऊन आलो. एक रुपयाही मानधन घेतले नाही. बाबा मला म्हणाले. काठोळे हे तुमचे चुकते आहे. ज्यांच्याकडे देण्याची ऐपत आहे त्यांच्याकडून मानधन व प्रवासखर्च घ्यायला हरकत नाही. बघा मी आता दत्ता मेघेंकडून आलो आहे. त्यांनी मला चांगले मानधन दिले. हे मानधन माझ्या चळवळीसाठी कामात येईल. तुम्ही आता मंत्र्यांकडे जाता. सहकार क्षेत्रातील दिग्गज लोकांकडे जाता. स्पर्धा परीक्षा वर भाषणे देता. त्यांची परिस्थिती प्रचंड चांगली आहे. तुम्ही असं करा आता तुमचा हा नियम बदला. ज्यांची देण्याची ताकद आहे त्यांच्याकडून प्रवास खर्च व मानधन घ्यायला हरकत नाही. पण बाबांचा हा सल्ला मी पाळू शकलो नाही. कारण मला समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायचे होते. मानधन आणि प्रवास खर्चाची अट टाकली तर कदाचित माझी ही मनोकामना पूर्ण होणार नव्हती.

मला आठवते एक वेळ आमचे भंडाऱ्याचे कार्यकर्ते श्री ज्ञानदेव बोडखे व त्यांचे नातेवाईक श्री बालपांडे यांचे काम घेऊन मी तत्कालीन मंत्री श्री बाळासाहेब थोरात यांच्या मलबार हिल वरील सेवा सदन या मुंबईतील बंगल्यावर गेलो होतो. खूप लोक भेटायला आले होते. बाबा आढाव पण आले होते. बाळासाहेब थोरात आतून बाहेर आले. त्यांनी आगंतुकांवर नजर फिरविली. बाबा दिसताच ते बाबांजवळ आले. बाबांना नमस्कार केला. आणि त्यांचे काम समजावून घेतले. आपल्या सचिवाला त्यांनी तशा सूचना केल्या. बाबांना सोडायला ते दारां पर्यंत गेले आणि बाबा रवाना झाल्यानंतरच इतर लोकांच्या त्यांनी भेटी घेतल्या. एक कॅबिनेट मंत्री बाबांना एवढी चांगली वागणूक देत आहे. यामध्ये बाळासाहेबांचे मोठेपण तसेच बाबांचे सत्यवर्तन दिसून येत होते.

सत्यशोधक समाजाचे अधिवेशन असले की बाबांची हमखास भेट व्हायची. बाबांची प्रकृती चांगलीच राहायची. याला कारणही तसेच होते. ते लोकांची जास्त काळजी करायचे. धावपळ जास्त करायचे. लोकांमध्ये जास्त मिसळायचे. त्यामुळे त्यांना या लोकांमध्ये मिसळल्यामुळे ऊर्जा प्राप्त होत होती. आता सोशल मीडियावर बाबा गेल्याची बातमी वाचली. जुन्या काळातील एक खरा सत्यशोधक आमच्यातून निघून गेला. याची जाणीव झाली. बाबा तुम्ही जे काम केले त्याचे मूल्यांकन होऊ शकत नाही आणि तेवढी पात्रताही आमच्या ठिकाणी नाही. पण तुम्ही जे काम करून गेले आहे ते आम्ही पुढे नेणार आहोत. तुमच्या कार्याला आमच्या सलाम आहे.

 

प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक

मिशन आयएएस

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा