जिल्हा बँकेकडून सहकार सक्षमीकरणासाठी भक्कम आश्वासन; कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांचे शास्त्रोक्त मार्गदर्शन
दोडामार्ग :
कोलझर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि., कोलझर यांच्या वतीने नारळ व सुपारी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आयोजित शेतकरी बागायतदार मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. आधुनिक बागायती तंत्रज्ञान, सहकार सक्षमीकरण आणि कृषी क्षेत्रातील नव्या संधींवर या मेळाव्यात सखोल चर्चा झाली.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी होते. त्यांनी आपल्या भाषणात ग्रामीण सहकारी संस्थांना बळ देण्यासाठी जिल्हा बँक कटिबद्ध असल्याचे सांगितले. बँकेच्या नफ्यातून सहकारी संस्थांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. विशेषतः कोलझर सोसायटीसाठी कार्यालयीन व सुसज्ज इमारत उभारणीसाठी जिल्हा बँक सहकार्य करील, असे त्यांनी स्पष्ट केले. केंद्र व राज्य सरकारच्या सहकारपूरक योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी संस्थांना केले.
बागायत सक्षमीकरणासाठी बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना शास्त्रोक्त मार्गदर्शन केले. जिल्हा फळ संशोधन केंद्र मुळदे येथील डॉ. आर. आर. राठोड, डॉ. एम. एस. शेडगे (सहाय्यक प्राध्यापक, उद्यानविद्या) आणि डॉ. वाय. सी. मुठाळ (तांत्रिक अधिकारी) यांनी नारळ व सुपारी लागवड, उत्पादन वाढ तंत्र, खत व्यवस्थापन, बी-बियाणे निवड, रोग-किड नियंत्रण आणि वनस्पती विकृतीशास्त्र या विषयांवर माहिती दिली.
मेळाव्यात सहकार व कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दोन सिंधुदुर्गकरांचा विशेष सत्कार करण्यात आला. सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल मनीष दळवी यांचा, तर ‘उत्कृष्ट शास्त्रज्ञ पुरस्कार’ मिळाल्याबद्दल डॉ. विजय दळवी यांचा गौरव करण्यात आला. याशिवाय पत्रकार शिवप्रसाद देसाई यांच्यासह अन्य पत्रकारांचाही सत्कार करण्यात आला.
मेळाव्याला जिल्हा बँक संचालक गणपत देसाई, विकास अधिकारी संजय ठाकर, तसेच कोलझर सोसायटीचे अध्यक्ष व संचालक उपस्थित होते. पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने शेतकरी-बागायतदारांनी हजेरी लावून मेळावा यशस्वी केला.
कार्यक्रम कोलझर सोसायटीच्या नेतृत्वाखाली उत्तमरीत्या पार पडला.

