सावंतवाडीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ६ अपक्षांची माघार
नगराध्यक्ष पदासाठी ६ तर नगरसेवक पदासाठी तब्बल ८६ उमेदवार रिंगणात
सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी तब्बल सहा अपक्ष उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामध्ये प्रभाग क्रमांक सात मधून भाजप मधून बंडखोरी केलेल्या अस्मिता परब व प्रभाग क्रमांक तीन मधून राधिका चितारी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.
तर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये गौरव जाधव,प्रभाग क्रमांक एक मध्ये नासीर पटेल, जावेद शहा व शबाब शेख यांनीही आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला.
गुरुवारी प्रभाग क्रमांक एक मधून नासिर शेख व प्रभाग क्रमांक सहा मधून अर्चित पोकळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. प्रभाग क्रमांक तीन मध्ये भाजपाकडून राधिका चितारी या इच्छुक होत्या त्या ठिकाणी मोहिनी मडगावकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे त्या नाराज होत्या त्या अपक्ष उमेदवार दाखल केली होती तर प्रभाग क्रमांक सात मध्ये अस्मिता परब यांनी उमेदवारी दाखल केली होती तेथील समृद्धी विर्नोडकर यांच्यासाठी ही उमेदवारी काहीशी मारक ठरणार होती दरम्यान पक्षाकडून दोघांचीही समजूत करण्यात आल्याने त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
आता माजी नगरसेवक सुरेश भोगटे, समी उल्ला खान , प्रसाद नाईक , ऋग्वेद सावंत , बबलू मिशाळ ,आशुतोष हेळेकर, हरीश पोटेकर , लतिका सिंग ,फरलाद बागवान हे अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
बबलू मिशाळ हे प्रभाग पाच मधून अपक्ष रिंगणात उतरले आहेत. ते शिवसेनेकडून इच्छुक होते . बबलू मिशाळ यांची बंडखोरी शिवसेनेसाठी कठिण होणार आहे. एकंदरीतच आता सावंतवाडी नगराध्यक्ष पदासाठी एकूण ६ उमेदवार रिंगणात राहिले. तर नगरसेवकांच्या २० जागांसाठी एकूण ८६ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.
