*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*न्यूटन..गांधी… तीन नियम..!!*
कागदावर वजन ठेवलं तर
कागद उडत नाही
सफरचंद झाडावरून खाली पडला
तो वर फांदीकडे पुन्हा जात नाही
…असं न्यूटनने शिकवलं होतं..
हिरव्या निळ्या रंगात बोट बुडवून
मी कागदावर ठसे उमटवतो
त्यावर सिंह वाघ,सारनाथाच स्तुपं
गांधी सोबत अशोक स्तंभ रंगवतो
…असं न्यूटनला मी आता शिकवतो!
मला ज्या न्यूटनने शिकवलं
तो शेवटी हलाखीत मेला
तीन नियम जगण्याचे सांगून
तो जगाला शिकवून गेला
त्या न्यूटनचे नियम मी झुगारतो..
कागदावर वजन ठेवलं तर
तोही नियमाविरुध्द सरकतो
वजन जसे जसे वाढवत जावे
तसा गांधी त्यावर प्रगट होतो
…न्यूटन !क्रिया प्रतिक्रियाचा नियम
गांधी माझ्या पाठीशी भिंतीवर उभा
मी असंख्य गांधी… गोळा करतो
जग न्यूटन गांधीना विसरले नाही पण
त्यांना जे जमलं नाही..ते मी करतो
.न्यूटन..गांधी जमलं तर माफ करा
सरकारी नियम मी मनापासून पाळतो
वजन कागदावर….गांधी तयार होतो
तीन माकडांपासून.. जगणं शिकतो
बाबा ठाकूर .
