You are currently viewing जि.प. पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा वेताळबांबर्डेचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा पार पडला जल्लोषात

जि.प. पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा वेताळबांबर्डेचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा पार पडला जल्लोषात

वेताळ बांबर्डे/कुडाळ :

मंगळवार दिनांक २४ जानेवारी, २०२३ रोजी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा वेताळ बांबर्डे नंबर एक चे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ येथील पटांगणात निमंत्रित मान्यवर, पालक, ग्रामस्थ, प्रशालेतील शिक्षक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत जल्लोषात संपन्न झाला.

त्यानिमित्त व्यासपीठावर बाव येथील उद्योजक मा. श्री. एस पी सामंत, सावंतवाडी येथील उद्योजक मा. श्री. शैलेश पै, कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. श्री. विजय चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्राथ. योजना विभाग, सिंधुदुर्ग) मा. श्री. प्रदीप कुडाळकर, उपशिक्षणाधिकारी मा. श्री. शोभराज शेरलेकर, एकलव्य शिक्षण व आरोग्य न्यास संस्थेच्या संचालिका मा. श्रीमती रेणूताई गावस्कर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा. श्री. जे के घाडी, शिक्षणतज्ञ मा. श्री. प्रदीप गावडे, केंद्रप्रमुख मा. श्री. बी. व्ही. तळेकर, प्रशालेचे माजी मुख्याध्यापक मा. श्री. पी. एस. सावंत, वे. बां. गडकरी शाळेच्या उच्च श्रेणी मुख्या. मा. श्रीमती रश्मी सावंत, पदवीधर शिक्षिका मा. श्रीमती स्नेहल सावंत हे मान्यवर उपस्थित होते.

शा. व्य. स. अध्यक्ष डॉक्टर घाडी यांच्या हस्ते उपस्थित विशेष अतिथींचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. शंकर गोसावी यांनी प्रास्ताविक व शैक्षणिक कामकाजाचे अहवाल वाचन केले. मान्यवरांच्या हस्ते विविध शालेय स्पर्धा मधील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. माजी मुख्या. श्री. सावंत यांचा श्री. चव्हाण साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शा. व्य. समितीच्या वतीने सरांना सन्मानपत्र देण्यात आले.

श्री चव्हाण साहेब यांनी बोलताना कार्यक्रमातील पालकांच्या उपस्थितीबाबत आनंद व्यक्त केला तसेच मराठी शाळा आपला दर्जा सुधारत आहे, आपल्या पाल्यांना मातृभाषेतून शिक्षण द्या असे आवाहनही केले. श्रीमती रेणूताई गावस्कर यांनीही शालेय कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. एकलव्य न्यास मधील मुलांना या शाळेत व्यक्तिमत्व विकासाची संधी मिळत आहे असेही नमूद केले. सूत्रसंचालन श्रीमती पल्लवी साईल यांनी केले तर आभार श्रीमती समीक्षा परब यांनी मानले.

गणपती नृत्याने संस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. कु. दुर्वा घाडी व कु. साक्षी सामंत या विद्यार्थिनींनी श्री. संदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बहारदार सूत्रसंचालन केले. अंगणवाडी शाळेतील चिमुकल्या मुलांनीही आपल्या कलागुणांचा आविष्कार रंगमंचावर दाखवला. या मुलांना अंगणवाडी शिक्षिका श्रीमती नाईक व श्रीमती सावंत आणि पालकांचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेच्या इ. पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक नृत्ये, संवाद, गायन सादर करीत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. भारतातील विविध राज्यांची पारंपरिक वेशभूषा परिधान करून मुलींनी केलेला रॅम्प वॉक लक्षवेधी ठरला. तसेच पाचवी ते सातवीच्या मुला मुलींचे दशावतारी नाटक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. या मुलांना श्री. साजुराम नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × one =