You are currently viewing रमणारी …माणसं !

रमणारी …माणसं !

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*रमणारी …माणसं !*

 

सुखी असुनही ….

सुखाकरता वखवखलेली

मनाचं पावित्र्य उमगूनही

मांगल्य हरवलेली ..

वास्तवाचे चटके विसरून

स्वप्नांत वावरणारी रमणारी

मनाशीच येरझारा घालणारी

प्रसंगी अपमान गिळणारी

आपलीच प्रतिमा डागाळणारी

मीचं बरोबरचा आग्रह धरणारी

अशी माणसं ..मी रोजचं पाहतो

 

संचीत जन्मांचे बंध

ओंजळीत… घेवून जातांना

जगण्याचा खोटा ..आनंद घेतांना

भावनांचा दुष्काळ अनुभवणारी

नात्याच्या खोड्यात अडकुनही

संवाद… विसरू लागणारी..

आयुष्याचा गुणाकार करतांना

पाढेच तळाशीचं….विसरणारी

देवासमोर उभे राहतांना

पवित्र अपवित्रेत… रमणारी

खिळे शोधत हातोडा मारणारी

अशी माणसं मी रोजचं पाहतो ..!

 

स्वतःची रंगरंगोटी स्वतःच करत

रंगमंचावरून उतरतांना पाहतो

आपल्या गतीनं पडद्याआड जातांना

अभिनयांत रमून ..गेलेली बघतो..

अभिनय.. वठला की ..गंडला

दाद न घेताच.. निघून जातांना

आपली स्वप्नं दुस-यात पाहणारी

मेकअप चेह-यावरचा न उतरवणारी

जगण्याचा बेमिसाल जल्लोष करणारी

अशी माणसं…मी रोजचं पाहतो

स्वतःत रमणारी माणसं रोजचं पाहतो

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा