सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नियोजन आराखड्याबाबत ना.अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न
वित्त व नियोजन मंत्री ना.अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन विभागाची राज्यस्तरीय आढावा बैठक आज मंत्रालयात पार पडली. कोकण विभागीय आढावा बैठकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नियोजनच्या २०२१-२२ आराखड्या संदर्भात चर्चा करत आढावा घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनसाठी यावर्षी १७० कोटीच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे.
यावेळी सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. उदय सामंत, माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी चर्चेत भाग घेत सिंधुदुर्ग जिल्हयातील विविध प्रश्न मांडले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हयाच्या पर्यटन विकासासाठी विशेष निधी देण्याचे ना.अजित पवार यांनी मान्य केले.त्याचप्रमाणे सिंधुरत्न योजनेसाठी तीन वर्षांमध्ये ५०० कोटी रु रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यासाठी देण्याचे मान्य करत त्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना राज्य नियोजन विभागाकडे पाठविण्याच्या सूचना ना.अजित पवार यांनी दिल्या.
याप्रसंगी वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई, सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. उदय सामंत, माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, कोकण विभागीय आयुक्त, वित्त व नियोजन विभागाचे सचिव, सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन अधिकारी आदी उपस्थित होते.