You are currently viewing कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी शाखा आयोजित तुतारी कवी संमेलनाचे बिगुल वाजले

कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी शाखा आयोजित तुतारी कवी संमेलनाचे बिगुल वाजले

*केशवसुत कट्ट्यावर होणार प्रथमच कवी संमेलन*

 

सावंतवाडी :

कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी आयोजित जिल्हास्तरीय “तुतारी कवी संमेलन” मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून २७ फेब्रुवारीला सावंतवाडी येथील मोती तलावाच्या काठी कवीवर्य केशवसुत कट्टयावर सायंकाळी ६.०० ते रात्री ९.०० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.

२७ फेब्रुवारी हा कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिन. या दिवशी मराठी भाषा दिन साजरा केला जातो. सावंतवाडी कोकण मराठी साहित्य परिषद मराठी भाषा दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करणार असून सायंकाळी ४.३० ते ५.३० या वेळेत केशवसुत कट्टा ते गांधी चौक बाजारपेठ अशी मराठी भाषा जागृती अभियान मिरवणूक काढून मराठी भाषेचे संवर्धन व जतन असा नारा दिला जाणार आहे. सावंतवाडी शहराची ख्याती संस्कृती व सांस्कृतिक वारसा जपणारी अशी आहे. त्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात कवी केशवसुत कट्टा येथे तुतारी जवळ प्रथमच मोती तलावाच्या काठी मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मोती तलावाच्या काठावरची सायंकाळ तुतारी कवी संमेलनाने आनंदमय करून मराठी भाषा दिन साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या जिल्हास्तरीय कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ कवी साहित्यिक अनंत वैद्य हे भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे  कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री.मंगेश मस्के प्रांताधिकारी श्री.प्रशांत पानवेकर, स्वागताध्यक्ष सुभाष गोवेकर, कवी विठ्ठल कदम, कवयित्री उषा परब, जिल्हा कोषाध्यक्ष भरत गावडे, ज्येष्ठ साहित्यिक इतिहासकार जी ए बुवा आदी उपस्थित राहणार आहेत. जिल्हास्तरीय तुतारी कवी संमेलन गेली कित्येक वर्षांपासून आयोजित करण्यात येते. गेली दोन वर्षे या संमेलनाचे यजमानपद सावंतवाडी शाखेकडे असून सावंतवाडी शाखेने हे कवी संमेलन वेगळ्या पद्धतीने करण्याचे ठरवले आहे. कवी केशवसुत कट्ट्यावरच तुतारी जवळ सायंकाळी जिल्ह्यातील नामवंत कवींच्या कविताना रंगत येणार आहे. प्रथमच केशवसुत कट्ट्यावर आयोजित तुतारी कवी संमेलनास सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ, कणकवली, मालवण, देवगड, वेंगुर्ले आदी भागातून कवी व कवयित्री या संमेलनात सहभागी होणार आहेत.

जिल्हास्तरीय कवी संमेलनाच्या निमित्ताने व मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठी भाषेचे संवर्धन व जतन व्हावे व मराठी शाळा टिकाव्यात यासाठी कवी संमेलनाच्या अगोदर सायंकाळी ४.३० ते ५.३० यावेळेत सावंतवाडी बाजारपेठेपर्यंत रामेश्वर प्लाझा, मोती तलावाच्या काठाकडून विद्यार्थी व साहित्यिक कवींची मराठी भाषा जतन संवर्धन साठी भव्य रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीचा शुभारंभ कार्यक्रमाला मुख्याधिकारी जयंत जावडेकर तहसिलदार अरुण उंडे, पोलीस निरीक्षक फुलचंद्र मेंगडे आदी उपस्थित राहणार आहेत. जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन आदी सावंतवाडी शहरातील शाळेतील विद्यार्थी या रॅलीत सहभागी होणार आहेत. या रॅलीत मराठी भाषा जनजागृतीसाठी मराठी भाषा प्रेमींनी सहभागी व्हावे, तसेच ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी आपली नावे विनायक गावस यांच्याकडे तर कवी संमेलनात ज्यांना कविता सादर करावयाच्या आहेत त्यांनी आपली नावे कवी विठ्ठल कदम व दीपक पटेकर 9421237568 वर नोंदवावीत असे आवाहन अध्यक्ष संतोष सावंत, सचिव प्रतिभा चव्हाण, खजिनदार डॉ. दीपक तुपकर आदींनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − 1 =