You are currently viewing मालवणातील पाच ग्रामपंचायतीवर भाजपचे सरपंच विराजमान

मालवणातील पाच ग्रामपंचायतीवर भाजपचे सरपंच विराजमान

मालवण

तालुक्यातील सरपंच, उपसरपंच पदाच्या आज झालेल्या निवडणुकीत पाच ग्रामपंचायतीवर भाजपचे तर एका ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा सरपंच विराजमान झाला. प्रतिष्ठेच्या बनलेल्या चिंदर व पेंडूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी निवडणूक झाली यात भाजपचे उमेदवार विजयी झाले तर शिवसेनेचा पराभव झाला.
तालुक्यातील खरारे-पेंडूर, मसदे-चुनवरे, कुणकवळे, चिंदर, गोळवण-कुमामे-डिकवल, आडवली-मालडी या सहा ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. गोळवण-कुमामे-डिकवल या ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व आहे. सरपंच पदासाठी सुभाष लाड तर उपसरपंच पदासाठी साबाजी गावडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गवंडे यांनी बिनविरोध निवड जाहीर केली. कुणकवळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदी मंदार वराडकर तर उपसरपंच पदी सुरेश राणे यांची निवड निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद घाडी यांनी जाहीर केली. मसदे-चुनवरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी श्रेया परब तर उपसरपंचपदी कलाधर कुशे यांची निवड निवडणूक निर्णय अधिकारी वासुदेव चौधरी यांनी जाहीर केली. आडवली-मालडी या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. यात सरपंचपदासाठी संदीप आडवलकर व उपसरपंच पदासाठी सोनाली पराडकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवडणूक निर्णय अधिकारी नितीन दाणे यांनी बिनविरोध निवड जाहीर केली.
चिंदर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी निवडणूक झाली यात राजश्री कोदे यांनी नम्रता महांकाळ यांचा सहा विरुद्ध पाच मतांनी पराभव केला तर उपसरपंच पदाच्या निवडणुकीत दीपक सुर्वे यांनी केदार परुळेकर यांचा पराभव केला. यात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अय्याज शेख यांनी काम पाहिले. खरारे-पेंडूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी निवडणूक झाली यात भाजपच्या सुनीता मोरजकर यांनी वैष्णवी लाड यांचा नऊ विरुद्ध दोन मतांनी पराभव केला. उपसरपंच पदासाठी विवेक जबडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवडणूक निर्णय अधिकारी भगवान गावकर यांनी बिनविरोध निवड जाहीर केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + 4 =