नगरपंचायतीची नवी इमारत, नळपाणी योजना आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांना निधीची हमी; “नागरिकांचा विश्वास राखणे हेच आमचे ध्येय” — आमदार निलेश राणे
कुडाळ :
कुडाळ शहराच्या विकासाच्या महत्त्वाच्या टप्प्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा देण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी पुढाकार घेतला असून नगरपंचायतीच्या नव्या इमारतीसह कचरा प्रकल्प, नळपाणी योजना प्रकल्प यांचे सादरीकरण त्यांनी पाहिले. या प्रकल्पांसाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आमदार राणे यांनी सांगितले.
नागरिकांचा विश्वास दृढ ठेवण्याचा आमचा मानस आहे, असे ते म्हणाले. कुडाळ नगरपरिषदेच्या विविध प्रकल्पांना आमदार राणे यांच्या माध्यमातून गती मिळत असून, शहराचा विकास वेगाने होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
नवीन इमारतीसाठी आवश्यक डिझाईनिंग आणि खर्च याबाबतही आमदार राणे यांनी सादरीकरण घेतले. शहरासाठी महत्त्वाकांक्षी असलेला नळपाणी योजना प्रकल्प तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प यांचेही सादरीकरण झाले. या तिन्ही प्रकल्पांसाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी खात्री त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.
या सादरीकरणावेळी उपनगराध्यक्ष संजय आंग्रे, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक तथा शहर प्रमुख अभिषेक गावडे, राजीव कुडाळकर, महिला शहर प्रमुख श्रुती वर्दम, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आमदार निलेश राणे यांनी पूर्वी घेतलेल्या बैठकीत विविध प्रकल्पांवर चर्चा झाली होती आणि हे प्रकल्प मूर्त स्वरूपात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले होते. आता या प्रकल्पांना मूर्त स्वरूप येत आहे.
