आज पुन्हा उजळणार मालवण रॉक गार्डन;
पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार तात्काळ कार्यवाही
मालवण :
वादळी वातावरणामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी मालवण रॉक गार्डन येथील वीज मीटर आणि वीजवाहिन्या जळाल्याने या लोकप्रिय पर्यटन स्थळावर रात्रीच्या वेळी अंधार पसरला होता. ऐन पर्यटन हंगामात वीज पुरवठा खंडित झाल्याने पर्यटकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता.
या समस्येबाबत मालवण भाजपच्यावतीने पालकमंत्री नितेश राणे यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी प्रशासनास तात्काळ दुरुस्तीचे आदेश दिले. पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार मालवण नगरपरिषद आणि वीज विभागाने तत्परतेने कार्यवाही करत नव्या मीटरची बसवणी व जळालेल्या केबलची दुरुस्ती पूर्ण केली आहे. त्यामुळे आज रात्रीपासून रॉक गार्डन पुन्हा एकदा प्रकाशमान होणार असल्याची माहिती भाजपा मालवण शहर-तालुकाध्यक्ष विष्णु (बाबा) मोंडकर यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनदृष्ट्या महत्वाचा असून दरवर्षी लाखो पर्यटक सिंधुदुर्ग किल्ल्यासह मालवण येथील रॉक गार्डनला भेट देतात. विशेषतः रात्रीच्या वेळी समुद्रकिनारी प्रकाशझोताखालील रॉक गार्डन पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण ठरते. काही दिवसांपासून अंधारामुळे रॉक गार्डनची शोभा कमी झाली होती. मात्र, आजपासून पुन्हा एकदा उजळणारं रॉक गार्डन पाहण्यासाठी पर्यटक उत्सुक आहेत.

