You are currently viewing मला कवीचा चष्मा लागला

मला कवीचा चष्मा लागला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य तथा अध्यक्ष, कोमसाप सावंतवाडी लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित पुस्तक परिचय*

 

*”मला कवीचा चष्मा लागला”*

✒️कवी: श्री अरुण वि. देशपांडे, पुणे

प्रकाशक: संवेदना प्रकाशन, पुणे

मूल्य: ₹.१५०/-

 

कवी श्री अरुणजी देशपांडे यांचे आतापर्यंत पुस्तकरूपात तीन कवितासंग्रह प्रकाशित झाले असून अनेक बालकविता, ई – बुक स्वरूपातील अनेक कवितासंग्रह, प्रिंट बुक स्वरूपात दोन हिंदी काव्यसंग्रह देखील प्रकाशित झाले आहेत. मराठीसह हिंदी भाषेवरही प्रभुत्व असणारे ज्येष्ठ कवी अरुणजी यांच्या श्री स्वामी समर्थ, गजानन महाराज आदींवरच्या अनेक रचना वाचण्यात आल्या असून त्यांचा लेखन प्रवास नक्कीच थक्क करणारा असून आजवर त्यांची तब्बल ७७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. एवढा मोठा गोतावळा सोबत असतानाही आपण छंदबध्द, वृत्तबद्ध कविता, गझल लिहू शकत नाही कारण, तंत्रशुद्ध कविता लेखनासाठी जो अभ्यास लागतो त्याचा अभाव ही कवीची मर्यादा मी ओळखून आहे, अशी प्रांजळ कबुली त्यांनी आपल्या मनोगतात दिली हे विशेष..!

नावात काहीच नसतं, पण इथे मात्र थोडसं वेगळं आहे.. नावातच बरंच काही आहे. ज्येष्ठ कवी श्री.अरुणजी देशपांडे यांना कवीचा चष्मा लागला असून त्या चष्म्यातून पाहून कुंचल्यातून शब्दांकित झालेल्या “मला कवीचा चष्मा लागला”… या काव्यसंग्रहातील रचना वाचकांना मंत्रमुग्ध करत आहेत. कवी म्हणतात, “माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या दर्शनी आणि अंतरंग अशा दोन्ही स्वरूपात फार फेरफार झाले आहेत. स्वभावात कवी वृत्तीची वाढ होत गेली. कवी मनाची अस्वस्थता, घालमेल, स्वप्नाळू वृत्ती, व्यक्त होण्याची असोशी, हे सगळे कवी गुण विशेष माझ्यात झिरपत गेले”. त्यामुळे कवीने नजरेने पाहिलेले, त्यांच्या मनाला जाणवलेले सर्व काही स्वतःच्या शब्दातून “मला कविता चष्मा लागला” या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून जगाला सांगितले आहे.

कवी श्री अरुणजी देशपांडे यांनी साध्या सरळ सुबोध शैलीत चार ते पाच कडव्यांच्याच रचना आपल्या काव्यसंग्रहात लिहिल्या आहेत. यामध्ये त्यांचे निसर्गावर असलेले प्रेम, गावाकडे धाव घेणारे मन, आई आणि बाई यांच्या बद्दल असलेला आदर, भारतीय संस्कृती, कुटुंब, स्वप्न, ध्येय अशा विविधांगी ८३ काव्यरचनांचा समावेश आहे.

गावाकडे मन माझे धाव घेते..

स्वप्नी मज माझे गाव दिसते..

असे गावाकडे धाव घेणारे मन, गावातील सुस्त सकाळ, साखर झोपेतील स्वप्ने, आजीची कानावर पडणारी प्रेमळ हाक, गोठ्यात हंबरणारी गाय, गोजिरवाणे वासरू आणि आजीने हातावर दिलेली दुधावरची साय अशा विविध आठवणी त्यांनी या कवितेत वर्णन केल्या आहेत. त्या वाचल्यावर नकळत आपलं मन सुद्धा हळूच गावाकडे पोहोचते आणि गावातच हरवून जाते.

दोन रूपं जरी

एकच रूप यांचं

आई आणि बाई

बाई असते आई..!

आई मध्ये असणारी बाई आणि बाईच असते हो एक आई..! असे आई आणि बाई यांच्यातील साधर्म्य दाखवताना घराची अब्रू म्हणजे बाई आणि दुःख लपवते ती आई..घराचे सुख बाई आणि घराचे घरपण आई..! अशा शब्दात कवींनी आई आणि बाई यांचे महत्त्व तथा श्रेष्ठत्व विशद केले आहे.

 

कितीही लपवा आंसवे जगापासुनी

थेंबांच्या ओझ्याने जडावतेच पापणी..

हुंदके कोंडीता आतल्या आत जरी..

वेदना टोचतात, कळा येतात उरी..

(आधार) या कवितेत आपल्या सहज सुलभ शब्दात कवीने मनातील भावना मांडल्या आहेत. आसवे जगापासून कितीही लपवली तरी अश्रूंच्या थेंबांच्या ओझ्याने पापणी जडावतेच..!

किती खोलवर विचार कवीने केला आहे याचा प्रत्यय या कवितेतील द्वीपदींमधून आपल्याला दिसून येतो.

हे मराठी माणसा, ऐक ना

व्यवहारी भाषा योग्य जरी

घरात वापरावी मराठी खरी

तिला तू विसरू नकोस ना..

(आपली मराठी) या काव्यरचनेतून कवी मराठी माणसाला आपल्या घरात वावरणारी मराठी कधीही विसरू नकोस असा सल्ला देतो आणि माय मराठीचा गौरव जरी त्रिभुवनी साजरा झाला तरी जेव्हा बाहेर बोलण्याची वेळ येते तेव्हा इंग्लिशचा आसरा का घेतोस..? असाही प्रश्न उपस्थित करतो आहे.

 

मनात असले तरी, येऊ नये ओठांवरी |

शांतपणे ऐकावे ते, कुणी काही बोले जरी ||

बोलतात माणसे जी, आपलीच असतात ती |

मन मोकळे करिती, तुमच्याच बरोबरी..||

(मनात असले तरी)… किती चांगला सल्ला या सरळ साध्या शब्दांमधून दिला आहे. कुणी काहीही बोलले तरी शांतपणे ऐकावे..कारण जी बोलतात ती आपलीच माणसे असतात… जरी शब्द कठोर बोलले तरी ती मन मोकळं करतात.. म्हणून मनात असले तरी ते ओठांवर येऊ नये.. आज आधाराच्या हाताची खरी गरज असल्याचे ते आपल्या काव्यातून अधोरेखित करतात…

माणसांचा वावर असणाऱ्या अफाट दुनियेत भेटणाऱ्या वेगवेगळ्या माणसांमध्ये रोज एक मित्र भेटतो.. आधाराचा हात देणारा, धक्क्यातून सावरून घेणारा.. केवळ पाठीवर हात फिरवून मित्र अश्रूंना सुद्धा थांबवतो… अशा या विश्वासाच्या मैत्रीच्या नात्यातील मित्राला “कृष्णसखा” असे संबोधून “मित्र” या कवितेत मैत्रीच्या सुंदर नात्याला शब्दांच्या पालखीत बसविले आहे.

 

गळक्या ओंजळीचे हात आपले

त्यात कधीही काहीच ना मावले |

जे मनाला कधी कधी भावले

नशिबात मात्र कधी ना भावले ||

 

आपल्या आयुष्यावर नाराज झालेले कवी आपल्या मनातील खंत व्यक्त करताना म्हणतात की, जे मनाला कधी कधी भावले ते नशिबाला मात्र कधीच भावले नाही.. कारण कवीचे हातच गळक्या ओंजळीचे होते त्यामुळे त्यात कधीच काहीच मावले नाही..

“गळक्या ओंजळीचे हात आपले” या कवितेतून त्यांनी भोवताली आनंद मेळे भरले असताना देखील आपल्याला मात्र सुखाचा क्षण सुद्धा मिळाला नाही…, असे सांगताना आयुष्यात मिळालेली तुच्छतेची वागणूक आणि त्यामुळे हिरमुसलेल्या मनातील खंत व्यक्त केली आहे.

 

आकाशीच्या निळाईने काय जादू केली

निळेशार गगन पाहुनी कविताच स्फुरली

निळे आकाश दिसे नभ सफेद संगती

निसर्गाची बघावी अनुपम ही रंगसंगती..

(निळे आकाश) या कवितेत, कवीने निळ्या आकाशाला पाहून आपल्याला चक्क कविता स्फुरली असल्याचे म्हटले आहे.. एवढे सौंदर्य निळ्या नभांगणी असल्याचे कवी आपल्या कवितेतील प्रत्येक कडव्यात नमूद करत आहे. निळ्या आकाशाच्या सौंदर्याचे वर्णन करताना निळ्या आकाशाच्या संगे सफेद नभ दिसतात आणि ही अवकाशी दिसणारी रंगसंगती कवीला अनुपम अलौकिक असल्यासारखी दिसते. हर प्रहरी बदलणारे आकाशाचे रंग, नदीच्या पाण्यात दिसणारे विहंगम प्रतिबिंब पाहून कवी निसर्गावर जणू भाळतो अन् मानवाला सदा निसर्गाचा मित्र बनून राहण्याचा सल्ला देतो.

(बाजार) या कवितेत तर कवीने बहुढंगी, बहुरंगी भरणारा बाजार शब्दांतून रेखाटला आहे. फुलांचा सुगंधी बाजार, भाजी, धान्याचा कपड्यांचा बाजार असे विविध बाजार भरवतानाच बिथरलेल्या, बिघडलेल्या स्वैर वागणाऱ्या माणसांच्या बाजाराला खेदाने का होईना येड्या खुळ्याचा बाजार म्हटले आहे.

शेवटी कवी “ध्येय” या कवितेतून सकारात्मक विचारांची साथ धरत, सकारात्मकतेची पाठराखण करत नवी पहाट उजाडली असून आता मनाशी ठरवलं ते साध्य करायला मोहिमेवर निघायला हवं असं स्वतःलाच बजावतो आहे.

एकंदरीत “मला कवीचा चष्मा लागला” या काव्यसंग्रहातून कवीने विविध विषयाच्या मुळांना हात घालून मुक्तच्छंद कवितांमधून स्वच्छंदी मनाने मुक्तपणे विहार केला आहे. आपल्या काव्यरचनांमधून विचार, मन आणि भावनांचा सुरेख असा त्रिवेणी संगम साधला आहे. त्यामुळे या काव्यसंग्रहातील कवितांमधून कवीच्या विचारांची खोली आणि प्रदीर्घ अनुभव शब्दशब्दांतून दिसून येतो. त्यामुळे नक्कीच कविता संग्रह व्यापक विचार करणाऱ्या कवी मनाच्या जवळ असणाऱ्या वाचकांच्या मनाला नक्कीच भावेल…

संवेदना प्रकाशनाने प्रकाशित केलेला हा काव्यसंग्रह नक्कीच लेखक आणि वाचक यांच्यामधील संवादसेतू ठरतो.. कारण कवीचे श्रेष्ठत्व आणि अनुभवाची जोड कवितांना मिळाली आहे. परंतु, काही पानांवर दोन तीन कडव्यांच्या कविता असल्याने अर्धेअधिक पान रितेच राहिल्याने काव्यसंग्रहात काहीतरी हरवल्यासारखा भास होत राहतो, रितेपणाची जाणीव होत राहते. यासाठी रित्या राहणाऱ्या पानांवरील कवितेला कवितेतील भाव ओळखून विषय अथवा आशयानुसार कृष्णधवल सुबक चित्रांची जोड दिली असती तर काव्यसंग्रहाला अधिक व्यापकता, सुंदरता प्राप्त झाली असती.

सरते शेवटी, ज्येष्ठ कवी श्री.अरुणजी वि. देशपांडे यांच्या काव्यशैली आणि व्यापक विचारांना सलाम…

उत्तरोत्तर आपल्याकडून असंच सुंदर, सरल, सुबक लेखन वाचायला मिळो या अपेक्षांसह काव्यसंग्रहाला शुभेच्छा देतो आणि रजा घेतो…

 

▪️▪️|| शुभं भवतु ||▪️▪️

 

श्री दीपक पटेकर (दीपी)

सावंतवाडी, सिंधुदुर्ग

८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा