*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आता दार… वाजत नाही ..!*
घराचं दार सारखं वाजायचं
संस्काराच्या बेड्यांना धक्का न देता
कडीचा आवाज न करता
ते घरचं सोडून दिले..!
नात्याचं रूतणार जोखडं
न दिसणा-या जखमा उकरायच्या
काळाची गरज होती
ती नातीचं सोडून दिली…!
स्पष्ट-अस्पष्ट प्रतिमेतून
स्वतःच अस्तित्व दिसायचं
त्या निर्जिव काचेची एवढी हिम्मत
त्या आरश्यालाच सोडून दिले…!
घरदार..आंगण..कुंपण..ओळख
नाती,प्रतिमा सारं काही सोडून दिले
हवेच्या सोबत डोळ्यांत शिरलेले
धुळीच्या कणांनाही सोडून दिले ..!
आता घराची दारे वाजत नाहीत
मला कुणी आता ओळखत नाही
विजनाच्या वाटेवर जन्मांचं दुखरेपण
आताश्या मला आवाज देत नाही..!
बाबा ठाकूर

