फोंडाघाटमध्ये ग्रामपंचायत कार्यालयासमोर चिखलाचे पाणी; शाळकरी मुले व नागरिक हैराण —
सरपंच यांना उद्या निवेदन देणार
फोंडाघाट (प्रतिनिधी) —
फोंडाघाट येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मोरीतून चिखलयुक्त पाणी रस्त्यावर साचत असून, त्याचा त्रास शाळकरी मुलांना, व्यावसायिकांना व मोटरसायकलस्वारांना मोठ्या प्रमाणात होत आहे. या साचलेल्या पाण्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांच्या अंगावर चिखल उडत आहे. शाळेमध्ये जाणारी मुले या चिखलामुळे त्रस्त झाली आहेत.
या विषयावर उद्या (दि. २३ सप्टेंबर) ग्रामस्थ सरपंच यांना निवेदन देणार असून, सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायतीने त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात येत आहे. मोरीच्या अयोग्य निकृष्ट स्थितीमुळे संपूर्ण गावाचा आरोग्यधोका निर्माण झाला आहे.
दसऱ्यानंतर होणार आंदोलन
या समस्येकडे प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यास दसऱ्यानंतर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. याची संपूर्ण जबाबदारी स्थानिक प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायतीवर राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
हा विषय थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोरील असल्याने ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे.
— अजित नाडकर्णी, संवाद मिडीया
