कणकवली :
वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी वामनदाजी शास्त्रोक्त गायन स्पर्धा घेण्यात येते यावर्षीच्या स्पर्धेची प्राथमिक फेरी साठी प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १० ऑक्टोबर असून प्राथमिक फेरीचा निकाल २१ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. स्पर्धकाला प्राथमिक फेरीमध्ये ऑनलाइन पद्धतीने सहभागी होता येणार असून कोणत्याही एका रागाची mp3 फाईल व्हाट्सअप वर पाठवावी लागणार आहे. अंतिम फेरीत पात्र झालेल्या स्पर्धकांची स्पर्धा कणकवली येथे दिनांक ०७ नोव्हेंबर २०२५ रोजी संस्थेच्या नाट्यगृहात संपन्न होणार आहे.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशामध्ये वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे एक वेगळे स्थान आहे. गेली ४८ वर्षे नाट्य, संगीत, साहित्य,सर्व ललित कलांचे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम प्रतिष्ठान आयोजित करीत आली आहे. संगीत क्षेत्रातील त्रिसूत्री उपक्रमाचे गतवर्षी २५ वे वर्ष संस्थेने साजरे केले असून या उपक्रमाचे हे २६ वे वर्ष आहे. या त्रिसूत्री उपक्रमात पहिल्या दिवशी वामनदाजी शास्त्रीय गायन स्पर्धा दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी संगीत रसग्रहण कार्यशाळा आणि तिसऱ्या दिवशी सायंकाळी पंडित जितेंद्र अभिषेकी स्मृति संगीत महोत्सव असे त्रिसूत्री उपक्रमाचे स्वरूप आहे.
या उपक्रमात शास्त्रीय संगीतातील नामवंत व्यक्तींचा सहभाग असतो वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे गुरु पंडित समीर दुबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन केले जाते.
या महोत्सवातील वामनदाजी शास्त्रीय गायन स्पर्धा संस्थेने जाहीर केली असून प्राथमिक आणि अंतिम अशा दोन टप्प्यात ही स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेत शास्त्रीय संगीताचा किमान पाच वर्षे अभ्यास केलेल्या स्पर्धकाला स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. अंतिम फेरी प्रथम पारितोषिक प्राप्त स्पर्धकाला या महोत्सवामध्ये आपले गाणे सादर करण्याची संधी मिळणार आहे.
संगीत क्षेत्रातील नामवंत परीक्षक, उत्तम साथ संगीत करणारे वादक व पारदर्शक परीक्षण अशी या स्पर्धेची वैशिष्ट्य असून स्पर्धेत विजेत्या स्पर्धकास अनुक्रमे प्रथम क्रमांक रुपये १०,००० द्वितीय क्रमांक रुपये ७,००० व तृतीय क्रमांक रुपये ५,००० अशी रोख पारितोषिके व स्मृतीचिन्ह दिली जाणार आहेत. स्पर्धेची माहिती https://forms.gle/Tzjy3MysLBmtc66J9 या संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी स्पर्धकांनी संस्थेच्या सहकार्यवाह सीमा कोरगावकर यांच्या ९४२२३८१९७५ या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या कार्याध्यक्ष यांनी केले आहे.

