*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम पाळणा गीत रचना*
*कृष्णजन्म पाळणा*
मध्य रात्रीला,श्रावणाष्टमीला
बाळकृष्ण जन्मला,ग बाई कृष्णजन्मला ||धृ||
घनघोर पाऊसधारा,
तुरूंग निजला सारा
अशा काजळ रातीला
परब्रम्ह लाभले देवकीला
आनंदे कवटाळले बाळाला
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला||१||
दिव्य कांती रूप सुंदर
लोभस, गोंडस बाळ श्रीधर
प्रेमाश्रुंनी बाळ नाहला
चुंबीले,जोजवले मुकुंदाला
सोडवेना त्या,सावळ्या बाळाला
कृष्ण जन्मला ग, बाई कृष्ण जन्मला||२||
गोकुळी,नंदाघरी सुखरूप
पोहचले बाळ,पाहिले श्रीरूप
हले पाळणा, रेशीम दोरी
आनंदमोद तो वाहे घरोघरी
नामकरण सोहळा थाटला
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला.||३||
माता यशोदा,धन्य जाहली
कुशीत, कान्हा येता आनंदली
भावविभोर,पाही एकटक माधवाला
पदराखाली घेता,लडिवाळास
स्तनपानाला
कृष्ण जन्मला ग बाई,कृष्ण जन्मला||३||
दृष्ट नका लावू गडे मम बाळाला
चित्तचोर मोहवी ,सकल जनाला
मधाळ हंसू,विलसे ओठांवरी
प्रेमळ. नजर श्री मुखावरी
पदराने दृष्ट काढते, ओवाळते कान्ह्याला
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला.,||४||
नको रूणझुण सख्यांनो पैंजणांची
नीजे तान्हुला,गरज शांततेची
मुठी चोखत, पहुडला पाळण्यात
ब्रम्हानंदी रंगला, ग,तो सुखात
पारावार न उरे आनंदाला
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला.||५||
सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर.
