You are currently viewing साहित्यिकांचा सन्मान व सत्कार करणे हे आपल्या संस्कृतीतच – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

साहित्यिकांचा सन्मान व सत्कार करणे हे आपल्या संस्कृतीतच – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

आज नागपूर शहरातील बाबूराव धनवटे सभागृहात गांधी फाऊंडेशनतर्फे आयोजित स्व. धरणीधर गांधी स्मृती समाजशिक्षक पुरस्कार डॉ. कुमार शास्त्री यांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी श्री. उदय सामंत यांनी  “साहित्यिकांचा सन्मान व सत्कार करणे हे आपल्या संस्कृतीतच आहे. विचार, महत्त्वाकांक्षा जरी वेगवेगळ्या असल्या तरी देशाप्रती सर्वांच्या भावना एकच असतात”, असे प्रतिपादन केले. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, आमदार नागो गाणार, डॉ. वि.स. जोग, डॉ. श्रीकांत तिडके, गिरीश गांधी आदी मान्यवर उपस्थित होते.

लोक समाधानी होतील तिथे जाण्याचा आनंद वेगळा असतो. समाजकारण करताना माणूस जोडण्याचा माझा स्वभावच आहे, असे सांगून सामंत म्हणाले की, जिवनात विचाराला अनन्यसाधारण महत्त्व असते. विचार जरी वेगळे असले तरी साध्य एकच असते. राज्य, देश घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. दुर्गम भागातील सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण मुंबईहून गडचिरोलीला आल्याचे सांगून, त्यातून आपली समाजाप्रती निष्ठा सिध्द होत असल्याचे उदाहरण सामंत यांनी दिले. साहित्यिकाचा सत्कार करताना एक वेगळाच आनंद होत असल्याचे सांगत राजकीय कार्यापेक्षा सांस्कृतिक कार्य करण्यात जास्त आनंद मिळाला आहे. साहित्यिक, विचारवंत, सांस्कृतिक क्षेत्राला आवश्यक असलेली मदत करण्यास उच्च व तंत्र शिक्षण विभाग कटिबध्द असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

 

यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनीही डॉ. कुमार शास्त्री हे साहित्यिक व चिकित्सक आहेत, यांच्यासारख्या साहित्यिकांचा सत्कार नेहमीच व्हायला हवा. समाजाला जागृत करण्याचे काम विचारवंत करत असल्याचे सांगितले.

स्व. धरणीधर गांधी यांच्या जीवन चरित्र्यावर प्रकाश टाकून डॉ. शास्त्री यांच्या कार्याचा गौरवोल्लेख वि.स. जोग यांनी आपल्या भाषणात केला. अभ्यास हा प्राध्यापक, अभ्यासक व पत्रकारांचा आत्मा असल्याचे त्यांनी नमूद केले. सत्कारमूर्ती डॉ. कुमार शास्त्री यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

श्री. उदय सामंत यांच्या हस्ते एक लाख रुपये, शाल व श्रीफळ देऊन शास्त्री दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास साहित्यिक, विचारवंत, प्राध्यापक, शिक्षक तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × four =