कसाल येथे भीषण अपघात : आईचा मृत्यू, चार महिन्यांची पवित्रा सुदैवाने बचावली
सिंधुनगरी प्रतिनिधी
कसाल मुंबई-गोवा महामार्गावर कसाल येथील खालसा धाब्यासमोर सोमवारी साडेबारा वाजता झालेल्या भीषण अपघातात शमिका शशांक पवार (वय २७) यांचा जागीच मृत्यू झाला. मोपेडला समोरून येणाऱ्या ईर्टीका कारची जोरदार धडक बसल्याने हा अपघात घडला.
मोपेडवर शमिका पवार पती शशांक पवार, चार महिन्यांची मुलगी पवित्रा व साडेतीन वर्षांचा मुलगा प्रभास यांच्यासोबत प्रवास करत होत्या. शमिका यांचा जागीच मृत्यू झाला, तर बाकी तिघे आश्चर्यकारकरीत्या बचावले.
या प्रकरणी ईर्टीका कारचालक राहुल शर्मा याच्याविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता असून, पोलीस तपास सुरू आहे. अपघातानंतर ओरोस पोलीस, महामार्ग पोलीस व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

