कलाकार मानधनात भ्रष्टाचाराचा पर्दाफाश :
संतोष कानडे यांच्या पुढाकाराने लाच घेतलेले पैसे परत
कणकवली
कणकवली येथे वयोवृद्ध कलाकारांसाठी मिळणाऱ्या राजर्षी शाहू महाराज वृद्ध कलाकार मानधन योजनेत मोठा भ्रष्टाचार उघड झाला आहे. या योजनेत पात्र कलाकारांचे प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी एका अधिकाऱ्याने प्रत्येकी १०,००० रुपये लाच घेतल्याचे समोर आले.
ही माहिती मिळताच कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष व भजनी कलाकार संस्थेचे संस्थापक बुवा श्री. संतोष कानडे यांनी तत्काळ कारवाई करत चौकशी सुरू केली. चौकशीत संबंधित अधिकाऱ्याने लाच घेतल्याची कबुली दिली आणि पैसे परत करण्यास सहमती दर्शवली.
बुवा श्री. कानडे यांनी लाच दिलेल्या लाभार्थ्यांची यादी मिळवून त्यांना कणकवली येथे बोलावले आणि अधिकाऱ्याच्या हस्तेच पैसे परत दिले.
या कार्यात कणकवलीचे मंडळ अध्यक्ष श्री. मिलिंद मेस्त्री आणि देवगडचे मंडळ अध्यक्ष श्री. संतोष किंजवडेकर सहभागी होते.
संबंधित अधिकाऱ्याने याआधीही अनेक कलाकारांची फसवणूक केल्याचे उघड झाले असून, अशा प्रकारच्या फसवणुकीचा अनुभव आलेल्या लाभार्थ्यांनी पुराव्यासह माहिती द्यावी, असे आवाहन बुवा श्री. संतोष कानडे यांनी केले आहे.
तसेच योजनेत कोणालाही पैसे देण्याची गरज नाही, अशी स्पष्ट सूचना त्यांनी कलाकारांना केली आहे.
