आ. दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराला वेंगुर्ल्यात भरभरून प्रतिसाद
सामाजिक बांधिलकीची जाणीव: वेंगुर्ल्यात ५४ जणांचे रक्तदान
वेंगुर्ला
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला येथे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ५४ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन माणुसकीचा संदेश दिला.
हे शिबिर शिवसेना वेंगुर्ला, युवासेना आणि महायुती यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस, बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय व समर्पण फाउंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. विशेष म्हणजे, वेताळ प्रतिष्ठानचे हे सलग ३०वे रक्तदान शिबिर ठरले.
शिबिराचे उद्घाटन वेंगुर्ल्याचे तहसीलदार ओंकार ओतारी आणि प्राचार्य प्रा. डॉ. डी. बी. गोस्वामी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. तहसीलदार ओतारी यांनी “रक्तदान हे माणुसकीचे प्रतीक आहे,” असे सांगून उपस्थितांचे कौतुक केले. तर प्राचार्य गोस्वामी यांनी विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे मत व्यक्त केले.
व्यासपीठावर शिवसेना व युवासेनेचे विविध पदाधिकारी, प्रतिष्ठित व्यक्ती आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. समारंभाचे सुंदर सूत्रसंचालन प्रा. डॉ. सचिन परुळकर यांनी केले. शिबिरात सहभागी सर्व रक्तदात्यांचा “कल्पवृक्ष” देऊन सत्कार करण्यात आला.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी वेताळ प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांसह अनेक स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. सामाजिक जाणीव जपणारा आणि तरुण पिढीला प्रेरणा देणारा हा उपक्रम वेंगुर्ल्यासाठी एक उल्लेखनीय घडामोड ठरली.

