You are currently viewing भविष्यावर बोलू काही….. व्याख्यानमालेच्या आयोजनाने उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे चा १० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

भविष्यावर बोलू काही….. व्याख्यानमालेच्या आयोजनाने उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे चा १० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

कुडाळ :

डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तसेच उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे च्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथे उद्यानविद्या या विषयाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी *भविष्यावर बोलू काही……* या विषयावर दोन दिवसांची अनोखी अशी व्याख्यानमाला आयोजित केली होती. पदवी अभ्यासक्रमानंतर योग्य दिशा ठरवण्यासाठी हा उपक्रम विद्यार्थ्यांना खूप फायदेशीर ठरला. या व्याख्यानमालेच्या माध्यमातून विविध विषयातील आठ तज्ञ मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील नियोजनाच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.

पहिल्या दिवशी सदर कार्यक्रमाचे उदघाटन डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभागाचे माजी विभागप्रमुख व थोर शास्त्रज्ञ डॉ.आर.टी.गुंजाटे यांच्या शुभहस्ते पार पडले. याप्रसंगी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.प्रदीप हळदवणेकर, मत्स्य शास्त्रज्ञ.डॉ.नितीन सावंत , स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कुडाळ चे शाखा व्यवस्थापक श्री.विनायक कुऱ्हाडे, सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ.प्रकाश तेंडुलकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य डॉ. यशवंत गावडे, तालुका अध्यक्ष व पणदूर चे सरपंच श्री.दादा साईल हे मान्यवर उपस्थित होते. डॉ.गुंजाटे यांनी भविष्यातील उद्यानविद्या या विषयातील विविध संधी या विषयावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या व्याख्यानामध्ये कृषी पर्यटना मधील विद्यार्थ्यांना असलेल्या संधी बाबत सावंतवाडी येथे स्वतःचे कृषी पर्यटन केंद्र चालवत असलेल्या सौ.अमृता पाडगावकर यांनी पर्यटन व भविष्यामधील संधी याविषयी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रामध्ये कणकवली येथील प्रगतशील शेतकरी व विद्यापीठाचे माजी विद्यार्थी श्री.संदीप राणे यांनी जैवविविधता व कृषी क्षेत्रामधील विद्यार्थ्यांची जबाबदारी या विषयावर सुंदर संवाद साधला. चौथ्या सत्रामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया कुडाळ शाखा व्यवस्थापक तसेच दापोली विद्यापीठाचे माजी विद्यार्थी श्री.विनायक कुऱ्हाडे यांनी विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रामधील नोकरीची संधी व त्यासाठी आवश्यक तयारी या विषयावर उत्कृष्ट मार्गदर्शन केले.

दुसऱ्या दिवशी पाहिले मार्गदर्शन प्रथितयश डॉक्टर डॉ.हर्षदा देवधर यांचे लाभले.त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून कॉलेज जीवन जगताना विद्यार्थ्यांची जबाबदारी या विषयावर समर्पक असे मार्गदर्शन केले. त्यानंतर सहाव्या व्याख्यानामध्ये दापोली नजीक असोंड या छोट्याश्या गावात कार्यरत असलेले काजू व्यावसायिक व शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त तसेच माजी विद्यार्थी श्री. विश्वास गोंधळेकर यांनी त्यांच्या व्यवसायातील अनुभव उलगडून दाखवले व उत्तम व्यावसायिक होण्यासाठी नेमके काय करावे लागेल याचे मार्गदर्शन केले. सातव्या व्याख्यानामध्ये उद्यानविद्या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी व उद्योजक श्री. वेदांत दळवी याने शहरी भागातील उद्यानविद्या या विषयातील विविध संधी या विषयावर सुंदर सवांद साधला. आठव्या व्याख्यानासाठी व समारोप कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी डॉ. फड यांची उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी या विषयावर उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले.

अश्या प्रकारे उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे चे सहयोगी अधिष्ठाता डॉ.प्रदीप हळदवणेकर यांच्या संकल्पतेतून साकारलेल्या या दोन दिवसीय व्याख्यानमालेच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील यशस्वी माजी विद्यार्थी व तज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाने महाविद्यालयाचा १० वा वर्धापन दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.संदीप गुरव, डॉ.परेश पोटफोडे,डॉ.रणजित देव्हारे, डॉ.गिरीश उईके, प्रा.महेश शेडगे, प्रा.हर्षवर्धन वाघ, डॉ.नीलिमा भोसले,डॉ.जया तुमडाम, प्रा.गजानन पतंगे, प्रा. प्रशांत देबाजे, डॉ.युवराज मुठाळ तसेच सहाय्यक कुलसचिव श्री.विलास यादव व सर्व आस्थापनीय कर्मचारी वर्ग, प्रक्षेत्र अधिकारी कर्मचारी वर्ग व महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीचे विशेष सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 5 =