*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*
*जाळीचे कपाट*
स्वयंपाक घराला लागून असलेल्या खोलीत भिंतीजवळ डावीकडे आणि उजवीकडे उघडणारी दोन दारं असलेलं एक लाकडी जाळीचं कपाट माझ्या माहेरच्या घरात होतं. त्याकाळी खरं म्हणजे प्रत्येकच घरात असं दुभत्याचं जाळीचं कपाट हे असायचंच.
*घरोघरी मातीच्या चुली* त्याप्रमाणे *घरोघरी जाळीचे कपाट गं मुली* अशी म्हण कोणीच का निर्मिली नाही याचे मला आता नवल वाटते.
खरं म्हणजे तेव्हा कुठे शीतकपाटे अथवा फ्रीज होते! अगदी एखाद्याच्याच घरी असा कौतुकाचा फ्रीज असायचा. बहुतेक ते घर एखाद्या सधन डॉक्टर किंवा वकिलाचेच असायचे, बाकी सगळीकडे जाळीचेच कपाट.
त्या काळात या जाळीच्या कपाटाशी समस्त गृहिणींचं अत्यंत जिव्हाळ्याचं नातं असायचं. मध्ये एक रुंद फळी असलेलं दोन कप्प्यातलं जाळीचं कपाट म्हणजे घरातलं एक महत्त्वाचं आभूषणच असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. शिवाय कपाटाचे आणखी एक वैशिष्ट्य असे की याचा आकार, उंची डिझाईन यामध्ये कमालीचा समताभाव होता. वरच्या कप्प्यात दूध, दही, लोणी खाली चिनी मातीच्या बरणीत लोणचं जाडं मीठ, वाळलेल्या चिंचेचे गोळे, कोकमं तसेच साकाळच्या जेवणातलं काही उरलेलं वगैरे नीट झाकून ठेवलेलं असायचं. शाळेतून घरी आल्यावर कडकडून भूक लागलेली असायची तेव्हा पहिली धाव या जाळीच्या कपाटापाशीच असायची काहीतरी खाण्यासाठी. आमच्या घरातल्या या कपाटाला वरचा एक पसरट टॉप होता. गमतीने मी त्याला कपाटाची *गच्ची* म्हणायचे. त्यावर आईने अगदी रुचून ठेवलेल्या विविध आकाराच्या पितळी डब्या, बरण्या होत्या आणि त्यात बहुतेक मसाल्यांचे पदार्थ असत आणि दर पंधरा दिवसांनी आम्ही हे मिक्स्ड धातूंचे प्रचंड आवडीचे सामान ब्रासो लावून घासायचो आणि त्यांना लकाकी आणायचो. या लखलखीत पितळी वस्तूंमुळे आमचं जाळीचं कपाट अतिशय देखणं, सुंदर नटलेलं वाटायचं.
अगदी अलीकडेच मी केळकर म्युझियम मध्ये असं जाळीचं कपाट पाहिलं. एखादा लहानपणीचा प्रिय, जवळचा ,घट्ट दोस्त भेटावा ना अगदी तस्से मला वाटले. त्या जाळीतून दडलेलं माझं बाळपण जणू काही मला बोलावत होतं! त्या क्षणी माझ्या मनात विचार आला की पूर्वीचं सारंच किती इको फ्रेंडली होतं ना! डबल डोअर, ट्रिपल डोअर, नो फ्राॅस्ट,फ्रीजर हे शब्दसुद्धा कोषात नव्हते आणि त्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या स्पर्धा घराघरात नव्हत्या. जीवनातला सारा टिकाऊ साम्यवाद आणि पर्यावरणपूरक विचार त्या एका जाळीच्या कपाटात सामावलेला होता.
खरोखरच धन्य तो काळ आणि धन्य ती समाधानी संतुष्ट माणसे!
*राधिका भांडारकर*.