निगडी, प्राधिकरण-
ज्ञानोबा आणि तुकोबांची पंढरीची वारी सुरू असताना निगडी प्राधिकरण मधील शब्दरंग कला साहित्य कट्टा, या समूहाने बुधवार,२५ जून २०२५ रोजी दुपारी ४ वाजता मारुती मंदिर,सेक्टर २५, परिसरात अत्यंत भारलेल्या वातावरणात वारीचा आनंद घेतला.
वारीमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील मंडळी पारंपरिक पोशाखात कपाळाला टिळा लावून उत्साहाने सामील झाले होते. लहान मुलांनी विठ्ठल, रुक्मिणी,तुकोबा, वारकरी यांच्या पेहरावात वारीमध्ये रंगत आणली.
वारीमध्ये महिलांनी लेझिम आणि टाळ पथकांमधून विठुरायाचा गजर करत रिंगण केले. ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथा यांची फुलांनी सजवलेली पालखी वारीच्या अग्रभागी होती.पालखीचे सुवासिनींनी औक्षण केले.
शब्दरंगमधील पुरुष सदस्यांनी पालखी , रांगोळ्यांनी सजवलेल्या रस्त्यावरून मिरवत मारुती मंदिर येथे नेली.सौ.प्रतिभा निफाडकर यांनी शंखनाद करून पालखीचे स्वागत केले. त्या ठिकाणी शब्दरंग कला साहित्य कट्ट्या वरील सभासदांची संत साहित्यावर आधारित संगीत नृत्य नाट्य अशा विविध प्रकारची सादरीकरणे झाली. सुमारे तीन तास सर्व मंडळी विठुरायाच्या नामात तुडुंब न्हाऊन गेली.
या वारीचे अत्यंत सुयोग्य नियोजन कट्ट्याच्या अध्यक्षा, सौ. ज्योती कानेटकर आणि कार्यकारिणी सदस्य प्रियांका आचार्य, चंद्रशेखर जोशी, माधुरी ओक, अशोक अडावदकर यांनी केले.
प्राधिकरण येथे वास्तव्य असलेले श्री.मुकुंद साठे यांच्या सूनबाईंनी अमेरिकेत न्यू जर्सी येथे विठ्ठल मंदिराची स्थापना केली आहे. त्यांच्या माध्यमातुन या वारीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग न्यू जर्सी येथे पाठवण्यात येणार आहे.