बांदा : “योग ही भारताची अमूल्य देणगी आहे, जी आज केवळ आरोग्यवर्धक व्यायाम म्हणून नव्हे तर जीवनशैली म्हणून स्वीकारली जात आहे. आजच्या युगात योग हा फक्त व्यायामाचा पर्याय नाही तर, तो एक जीवनशैली आहे. एक मानवी जीवनातील अंतर्गत शांतीचा मार्ग आणि यशस्वी जीवन जगण्यासाठीचा पाया ठरू शकतो ” असे प्रतिपादन गोगटे- वाळके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांनी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या प्रसंगी केले.
बांदा येथील गोगटे-वाळके महाविद्यालयाच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून हा दिवस मार्गदर्शन व प्रात्यक्षिकाच्या स्वरूपात महाविद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी योगविषयक मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. रमाकांत गावडे हे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. डॉ.गावडे म्हणाले की, “सततची धावपळ, काळजी, अपूर्ण झोप आणि असंतुलित आहार यामुळे जनमानसांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, झोपेच्या समस्या, चिडचिड, आत्मविश्वासाचा अभाव दिसून येतो. अशा परिस्थितीत योग हे सर्वांगीण आरोग्य देणारे साधन ठरते. यासाठी आजच्या काळात योगाची साधना करणे महत्त्वाचे आहे. योग म्हणजे केवळ आसने नसून ती एक शास्त्रशुद्ध आणि आत्मशोधाची प्रक्रिया आहे. योग म्हणजे नव्याने स्वत:ला घडवण्याची प्रक्रिया होय.
मन, शरीर, आत्मा यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न योगाच्यामार्फत केला जातो. एक यशस्वी आणि समाधानी जीवनासाठी व शांती, आरोग्य ताजेपणा, प्रसन्नता आणि आत्मविश्वास हे सर्व गुण आपल्यात असतील तर आपले जीवन फुलत जाते. हे सर्व गुण योगातून मिळतात त्यामुळे योग तुमच्या जीवनाचा भागीदार होतो. गोगटे-वाळके महाविद्यालयाच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी प्रात्यक्षिकाच्या स्वरूपात योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी या योग दिनाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. रमाकांत गावडे यांनी दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी असणारी विविध आसने आणि योग साधनांचे महत्त्व विशद करून विविध आसनांचे प्रात्यक्षिक दाखवले. प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. एन डी कार्वेकर यांनी केले, संयोजन प्रा.निरंजन आरोंदेकर व प्रा.डाॅ. डी.जी .जोशी यांनी केले तर आभार प्रा. यु.टी.परब यांनी व्यक्त केले.
