ताणतणावापासून मुक्त करण्यासाठी योगा अत्यंत आवश्यक : प्रभाकर सावंत
कुडाळ एमआयडीसीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात..
कुडाळ
योग भारतीय संस्कृतीचा एक बहुमोल वारसा असून, तो जगभरात पोहोचवण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. व्यस्त जीवनशैलीमध्ये शरीर आणि मन यांना ताणतणावापासून मुक्त करण्यासाठी योगा अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले. जागतिक योग दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा भाजपने प्रत्येक मंडलात जनतेसोबत योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था, कुडाळ एमआयडीसी येथे योग दिन शिबिर उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
सावंत यांनी पुढे सांगितले की, आज संपूर्ण भारतात शासकीय कार्यालये, शाळा, विविध संस्था आणि योग केंद्रांच्या माध्यमातून हा योग दिन साजरा होत असताना, पंतप्रधान मोदींचा रोजच्या जीवनात नियमित सराव करून लहान-थोर सर्वांनी निरोगी, आरोग्यसंपन्न जीवन जगावे हा संदेश देशातील प्रत्येकापर्यंत पोहोचावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाला सहसंयोजक राजू राऊळ, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सौ. संध्या तेरसे, बंड्या सावंत, युवा मोर्चा अध्यक्ष रूपेश कानडे, महिला मोर्चा सरचिटणीस सौ. अदिती सावंत, महिला अध्यक्षा सौ. आरती पाटील, पिंगुळी सरपंच अजय आकेरकर, सुनील बांदेकर, सौ. मुक्ती परब, गुरु देसाई इत्यादी भाजप पदाधिकारी उपस्थित होते. तसेच, बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे प्राचार्य अरुण मर्गज, दत्तप्रसाद खानोलकर, चैताली बांदेकर, प्रा. रिद्धी पाताडे यांच्यासह योग अभ्यासक आणि विद्यार्थी उपस्थित होते.