डहाणू :
दि डहाणू एज्युकेशन ट्रस्ट संचालित शाळा के. एल. पोंदा हायस्कूलच्या उपक्रमशील आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्त्या, ज्येष्ठ साहित्यिका, कथाकार, निवेदिका, वक्त्या, पर्यावरण प्रेमी कवयित्री यांनी दरवर्षी प्रमाणेच याही वर्षी विद्यार्थ्यांसाठी खास उन्हाळ्यातील सुट्टीतील साहित्यिक मेजवानी म्हणून १ मे ते १५ जून या कालावधीत रोज एक कविता हा स्तुत्य उपक्रम राबवला. हा कवितेचा उपहार केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर शिक्षक, पालक आणि समाजातील सर्व थरातील रसिक वाचकांसाठी खूप सुंदर मेजवानी ठरला आहे. एक विरंगुळा, साहित्यिक अभ्यास म्हणून तर हा ठेवा महत्त्वाचा आहेच. शिवाय प्रबोधन आणि संस्कार या दृष्टीने सुध्दा वाचक रसिकांना यातून फार मोठी मेजवानी मिळालेली आहे!
सौ. अनुपमा जाधव यांची आतापर्यंत चार पुस्तके प्रकाशित असून त्यात समुद्रसंगीत, वहिवाट, हे मराठी कवितासंग्रह, अनुबंध हा कथासंग्रह आणि रानझरा हा मराठी कविता व तिचेच अहिराणी भाषांतर असा हा कवितासंग्रह प्रकाशित आहे.
सौ. अनुपमा जाधव यांनी रोज एक कविता सादर करताना त्यात वैविध्य तर ठेवलेच. शिवाय विद्यार्थ्यांचे मनोरंजनाबरोबरच प्रबोधनही होईल असा दृष्टिकोन ठेवून रोज यथोचित कविता सादर केल्या. यातून लहान मुलांच्या कल्पनाशक्तीला चांगली प्रेरणा मिळाली. यातून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी व त्यांना कविता लेखनाची आवड सुध्दा निर्माण होईल असाही दृष्टीकोन ठेवलेला आहे. विषय लहान मुलांच्या कल्पना विश्वातील असले तरी ते मोठ्यांना सुध्दा भावतील व आवडतील असेच आहेत. उदाहरणार्थ बाप, माय, पाऊस, चाफा बहरला, शेतकरी, शौर्य भारतीय सैनिकांचे, माझी शाळा, संत कबीर, नाती, कवितेचं पीक, सुनेचा नका करू छळ, मैत्री माझा श्वास, शिवराज्याभिषेक, माता रमाबाई आंबेडकर.. या सारखे किती तरी जिव्हाळ्याचे विषय त्यांनी निवडलेले दिसतात. त्यांच्या या कविता दैनिक शब्दगंगा या दैनिकात तर प्रकाशित होत होत्याच. शिवाय संवाद मिडिया मधूनही त्यांना प्रसिद्धी मिळत होती. दरम्यान fm रेडिओवरून त्यांची मुलाखत प्रसारित करण्यात आली. तसेच दैनिक लोकशाही, दै.शब्दराज पुणे येथून सुध्दा काही कविता प्रकाशित झाल्या आहेत. दरम्यान या उपक्रमाची अनेकांनी दखल घेऊन आपले अभिप्राय सुद्धा विविध दैनिकातून प्रकाशित केले आहेत. त्यांच्या या लेखनाची दखल सोशल मीडियावर, व्हाट्सअपवर वाचक रसिक तसेच विद्यार्थी व पालकांनी घेतलेली दिसून येते. एवढेच नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच , शाखा नाशिक जिल्हा यांनी तर याच कालावधीत तब्बल बत्तीस कवितांना खास त्या त्या कवितांची दखल घेऊन त्यांना खास सन्मानपत्र देऊन त्यांचा उचित असा सन्मान केला आहे!
कवयित्री अनुपमा जाधव यांच्या या साहित्यिक कार्याबद्दल त्यांना वेळोवेळी अनेक पुरस्कार सुध्दा मिळालेले आहेत. त्यांच्या लेखनीला वंदन करतो. त्यांचे खूप खूप मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या या साहित्यिक प्रवासाला शुभेच्छा देतो.
– कवी तुकाराम ढिकले
– ज्येष्ठ साहित्यिक
– ७५८८८२८८३४