विकासभाई सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत भव्य बुद्धिबळ स्पर्धा
सावंतवाडी
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सहकारातील अग्रणी व्यक्तिमत्त्व तथा जेष्ठ नेते विकासभाई सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त २१ वर्षांखालील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी भव्य बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, २० जून आणि रविवार, २२ जून रोजी सकाळी ९:३० वाजता राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या सभागृहात ही स्पर्धा रंगणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गुणवंत खेळाडूंना आकर्षक बक्षिसे देऊन गौरवण्यात येणार असून, यामुळे युवा खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची आणि प्रोत्साहन मिळवण्याची उत्तम संधी मिळेल.
विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे
स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम, आकर्षक चषक आणि प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित केले जाईल. २१ वर्षांखालील मुख्य गटात प्रथम क्रमांकास रु. १,५००, द्वितीय क्रमांकास रु. १,०००, तृतीय क्रमांकास रु. ७००, चौथ्या क्रमांकास रु. ५०० आणि पाचव्या क्रमांकास रु. ३०० अशी रोख बक्षिसे दिली जातील. यासोबतच आकर्षक चषक आणि प्रशस्तीपत्रही प्रदान केले जाईल.
तर १५ वर्षांखालील मुले, १० वर्षांखालील मुले आणि १५ वर्षांखालील मुलींच्या गटांसाठी प्रत्येकी प्रथम क्रमांकास रु. ५००, द्वितीय क्रमांकास रु. ३०० आणि तृतीय क्रमांकास रु. २०० रोख बक्षीस, आकर्षक चषक आणि प्रशस्तीपत्र दिले जाईल.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आबा कोटकर यांच्याकडून २५ कॅटरिंग टेबल्सची व्यवस्था करण्यात आली आहे. संयोजकांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.