सावंतवाडीतील प्रसाद कोल्ड्रिंक्सचे मालक प्रसाद पडते यांची आत्महत्या
सावंतवाडी:
शहरातील ‘प्रसाद कोल्ड्रिंक्स’चे मालक प्रसाद पडते यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचे आज दुपारी उघडकीस आले. घराच्या दरवाजातून रक्त बाहेर येताना दिसल्याने हा प्रकार समोर आला आणि परिसरात खळबळ उडाली. दोन-तीन दिवसांपूर्वीच ही घटना घडली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
गेले दोन-चार दिवस पडते यांचे घर बंद होते आणि ते दिसून येत नव्हते. आज दुपारी त्यांच्या घराच्या दरवाज्यातून मोठ्या प्रमाणात रक्त बाहेर येत असल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. यामुळे संशय बळावला आणि नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांच्या उपस्थितीत स्थानिक रहिवासी राजू भाट आणि आबा पडते यांनी घराचा दरवाजा तोडला. आतमध्ये प्रसाद पडते यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने व त्यातून रक्त बाहेर आल्याने ही घटना किमान दोन-तीन दिवसांपूर्वी घडली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. नागरिकांच्या मदतीने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
प्रसाद पडते यांचे सावंतवाडी बाजारपेठेत ‘प्रसाद कोल्ड्रिंक्स’ नावाचे प्रसिद्ध दुकान आहे. ते अनेक वर्षांपासून हा व्यवसाय करत होते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाल्यापासून ते या घरात एकटेच राहत होते.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संजय कातिवले, हवालदार महेश जाधव, अनिल धुरी, निलेश नाईक, सचिन चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेमुळे सावंतवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.