You are currently viewing ऋतुरंगले

ऋतुरंगले

*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी वि ग सातपुते लिखित काव्याचे सौ गौरी चिंतामणी काळे यांनी केलेले रसग्रहण*

 

*ऋतुरंगले*

**********

कसे हरवले दिवस सारे

मज कळले कधीच नाही

ऊन्हे कोवळी पांघरताना

सांजाळलेले कळले नाही

 

ऋतुरंगले पाहता सोहळे

तुला कधी विसरलो नाही

मनगाभारी तुझेच आठव

कधी क्षणभर सरले नाही

 

तू अंतरीची अभिसारिका

मी कशासही भुललो नाही

प्रीतभावनांची सात्विकता

कधी उरी कोमेजली नाही

*********************

*१४ जून २०२५ ( १४ )*

*वि.ग.सातपुते. ( भावकवी )*

📞 ( 9766544908 )

 

अत्यंत कमी शब्दांत जीवनाचे अंतिम ध्येय काय असावे हे सांगते कविवर्य वि. ग. सातपुते सरांची *ऋतुरंगले* ही भावकविता.

मनुष्य जन्म घेतला कि प्रपंच करणे ओघाने आलेच.फक्त काही संत साधु मुनिजन फक्त आणि फक्त परमार्थाची वाट धरतात.सामान्य मनुष्य एकदा प्रपंचात गुरफटला कि तो त्यात गुंतून पडतो व वेळ काळाचे भान राहत नाही.आपले परिजन, नातीगोती ,भाव भावनांचा मोहक पसारा ह्या सर्व गोष्टीत दिवस मास वर्षे कशी हरवून जातात हे माणसाला कळत नाही.

या कवितेत आदरणीय अप्पा म्हणतात कि काळ आपल्या गतीने पुढे चालत राहिला आणि दिवस पाहता पाहता कसे सरुन गेले हे मला कळलेच नाही.

*उन्हे कोवळी पांघरताना*

*सांजाळलेले कळले नाही*

या ओळीत मनुष्य स्वभावाचे दर्शन घडते.आपण सर्व नेहमीच भूतकाळात रमतो.जुन्या गोष्टी,आठवणी अगदी उराशी कवटाळून बसतो.अनेक असे मागे बघताना भविष्यात काय असेल याचा विचार आपल्या मनाला शिवत नाही. मनुष्य जन्माच्या तीन अवस्था असतात.शैशव ,तारुण्य व वृद्धावस्था.गतकाळातील दिवस ,त्या स्मृतींमधे जीव रमत असताना कधी सांजवेळ समोर उभी राहते हे कळत नाही.

*ऋतुरंगले पाहता सोहळे*

*तुला कधी विसरलो नाही*

या दोन ओळींत पूर्ण कवितेचे सार सामावले आहे जणू.कविवर्य म्हणतात कि बालपण ,तारुण्य ते वृद्धत्व असा या जीवन प्रवासात अनेक व्यक्तींशी संपर्क आला.कितीतरी नातेसंबंध जोडले गेले.कैक ऋणानुबंध जुळले आणि अनेक हृद्य सोहळ्यांमधून जीवनात रंग भरले गेले.या सर्व रंगात हे ईश्वरा अध्यात्माचा रंग सर्वोत्तम होता.हे ईश्वरा माझ्या मनाच्या गाभाऱ्यात फक्त तुझीच मोहमयी मूर्ती व तूला एक क्षण ही मी विसरलो नाही.

*अंतरीची अभिसारिका* हे शब्द सरांनी दोन अर्थाने वापरले आहेत असे वाटते.एक म्हणजे साक्षात परमेश्वर व दुसरा मृत्यु.मनात दडून बसलेली प्रेयसी जिच्या भेटीची आंतरिक ओढ लागते अशी अभिसारिका जणू परमेश्वर.मृत्यु ही सुद्धा अभिसारिकाच आहे.तिची भेट अवश्यंभावी आहे…भेटीची हुरहूर आहे आणि तिचा विचार कधीच मनातून पुसला जात नाही.

ईश्वर भेटीसाठी आतुरलेले मन कोणत्या ही गोष्टीला भुलत नाही.कविवर्य म्हणतात आता जीवात्मा चराचरात वसलेल्या शिवाच्या भेटीसाठी उत्सुक आहे.ही अंतरीची ओढ कधीच कणभर ही कमी झाली नाही.परमेश्वरासाठी सात्विक भक्तीभाव मनात सदैव फुलत राहिला. कैक *ऋतुरंगले* तरी ही ईश्वराच्या भक्तीचा ,सात्विक प्रेमाचा रंग हृदयी नित्य आनंदाची उधळण करत राहिला.

 

सौ. गौरी चिंतामणी काळे

प्रतिक्रिया व्यक्त करा