*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक भोवतालकार साहित्यिक विनय सौदागर लिखित काकल्याचे तर्कट:१८*
*पोरांची शाळा*
शाळा कालच सुरू झाली होती. काकल्या आपल्या पाच-सहा वर्षाच्या छोट्या नातवाला घेऊन घरी आला होता. मी विचारलं, “याला शाळेत नाही पाठवलं?”
“पाठवक् होयो?” काकल्याने प्रतिप्रश्न केला.
“अर्थात.” मी म्हणालो. या ‘अर्थात’ शब्दाचा निश्चित अर्थ मला माहीत नाही, पण हा शब्द अडचणीला उपयोगी पडतो.
“कित्याक धाडू?”
“अरे शिकण्यासाठी.”
“कोन शिकायतलो?”
“अरे शिक्षक शिकविणार.”
मी वल्हे मारत होतो, पण सुकाणू काकल्याच्या हाती होतं. वार्याची दिशाही नीट कळत नव्हती.
“बाबानू, पोरांची शाळा केलास तुमी. शाळेत सात वर्ग हत आणि मास्तर तीन. कोण-कोण, काय-काय आनी खुयच्या यत्तेक शिकयतलो? ” काकल्या सुकाणूवरील पकड घट्ट करीत म्हणाला. मी गप्प बसलो.
“बरां, मास्तरांका येळ आसा? तेंचे मिटिंगी, कामगिरे, सुटये,भायली कामा, समूहगान-समूहनृत्य, जयंत्ये मयंत्ये हेच्यात ते शिकयतले केवा ता माका सांग. “माझ्याकडे नेमकं उत्तर नव्हतं, तरी थातूरमातूर बोलावं म्हणून बोललो. “अरे पण त्यातही ते काहीतरी करतीलच ना.”
“ह्या ‘काहीतरी’ म्हंजे काय?” काकल्याने होडी लाटेवर चढवली.
मी सावरत राहिलो.
“बरा, दुसरा माका याक सांग. पूऱ्या वर्सात पुस्तकातला तरी शिकवन् सरता काय?” असं म्हणत काकल्याने काखेत धरलेलं सातवीचं पुस्तक काढून माझ्यासमोर टाकलं आणि म्हणाला “शाळेतलो डी.एड. मास्तर हेतला सायन्स कसा शिकयतलो आणि ता कोनाक कळतला, ता माका सांग.” थोरल्या नातवाचं पुस्तक तो घेऊन आला होता. पुस्तक चाळलं. ते खरंच अवघड होतं. त्याचा मोठा नातू कालच मला भेटला होता. तो म्हणालेला की, ‘मी आठवीत्सून मराठी विज्ञान घेतलय. माका ह्या जमणा नाय.’ खरंच,अपूऱ्या शिक्षक वर्गात हा सेमी इंग्लिशचा आग्रह कशासाठी हे मला कळेना.
“अरे पण,मुलांना शाळेत न पाठवून चालेल कसं?” होडी लवकर किनार्यावर आणण्याचा मी प्रयत्न केला.
“थोरलो नातू धावी झालो काय तेका मी माडार चढाक शिकयतलय. अरे गावात येक पाडपी मेळणा नाय. गावात काम करणारे नायच आणि तेतूर कारागीर मुळीच नाय. पंप दुरुस्त करणारे, आंबे काढणारे, बावीत उतारणारे, छपरार चढणारे कोणच नाय. तेवा अशे पोरगे तयार करूची शाळा होयी. हयत्या हाफिसासारख्या शाळेची गराज नाय. ”
“हे बघ मुलांना कारागीरी शिकवूया, पण शालेय शिक्षणही हवंच. बघू, गावातल्या जाणत्या लोकांना एकत्र करून मुलांना जादाचं शिकवायचं बघतो मी.” मी वल्हे काढून होडीत ठेवले.
“इचार बरोबर, पण शेक्य नाय? कारण हे तुझे दोस्दार वाटसपार शिकयतीत, फळ्यार नाय.” होडी खडकावर आपटल्याचा भास झाला.
थोडक्यात, मला रिमूव्ह करून काकल्या लेफ्ट झाला होता.
*विनय सौदागर*
आजगाव, सावंतवाडी
9403088802