मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कै. अण्णासाहेब पाटील यांनी सन १९०० साली स्थापन केलेली अखिल भारतीय मराठा महासंघ ही संस्था आज १२५ वर्षांचा प्रेरणादायी प्रवास पूर्ण करत आहे. सामाजिक न्याय, समता आणि समाजोन्नतीचा ध्यास बाळगणाऱ्या या संघटनेच्या माध्यमातून कै. अण्णासाहेब पाटील व कै. शशिकांत पवार यांसारख्या नेतृत्वकर्त्यांनी आपले ज्वलंत विचार संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवले.
सध्या या संस्थेच्या राष्ट्रीय नेतृत्वाची जबाबदारी अध्यक्ष राजेंद्र कोढंरे, उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, सरचिटणीस प्रकाश देशमुख आणि कोषाध्यक्ष प्रमोद जाधव यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पाडली जात आहे.
*मुंबई विभागात नवचैतन्याचा संचार*
१२ जून २०२५ रोजी, वसंतदादा पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, चुनाभट्टी, मुंबई येथे सरचिटणीस प्रकाश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विभागाची विशेष बैठक पार पडली. या बैठकीस मुंबई विभागातील आजी-माजी सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर बैठकीत पुढील नियुक्त्या एकमताने करण्यात आल्या: मुंबई विभाग अध्यक्ष : रुपेश मालुसरे, महिला अध्यक्ष : स्मिता साळवी, उपाध्यक्ष : अशोक देसाई, महेंद्र तावडे, संतोष साळवी, सुरज पाटील, सरचिटणीस : भालचंद्र दळवी, संदीप देसाई, भालचंद्र धुरी, कोषाध्यक्ष : प्रकाश म्हाब्दी, मुंबई संपर्कप्रमुख : सुभाष बामणे या निवडीमुळे मुंबई विभागात नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून नवचैतन्य आणि विकासदृष्टीचा संचार होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
*समाजहितासाठी सामूहिक ध्यास – स्पष्ट कार्यदृष्टी*
नवनिर्वाचित अध्यक्ष रुपेश मालुसरे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, “राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोढंरे आणि सरचिटणीस प्रकाश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दिलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवून काम करू. मराठा समाजातील मागासवर्गीय तरुणांसाठी शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात प्रभावी उपक्रम राबवण्याचा निर्धार आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि सारथी या शासकीय संस्थांच्या सहकार्याने समाजासाठी उपयोगी ठरेल अशी भरीव कामगिरी करणार आहोत.”
त्यांनी पुढे असेही नमूद केले की, समाजाला दिशा देणारे व्यावसायिक मार्गदर्शन, शैक्षणिक मदतीचे उपक्रम, महिला सक्षमीकरण, तसेच युवा नेतृत्व घडविण्यावर आम्ही विशेष भर देणार आहोत.
*कृतज्ञता आणि पुढील वाटचाल*
सदर संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रविणभाऊ पवार, एड. धर्मराज जाधव, अशोक देसाई, सचिन शिंदे, शंकर मोहिते, सतीश जाधव यांचे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी मनःपूर्वक आभार मानले.
सदर निवड केवळ औपचारिक नसून, ती समाजहितासाठी सक्षम कृतीची नवी दिशा देणारी ठरेल, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
*नव्या नेतृत्वाकडून अपेक्षा*
मुंबई विभागात नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांकडून समाजमनात सकारात्मक परिवर्तनाची नांदी होईल, अशी अपेक्षा असून, संघटनेची प्रतिष्ठा अधिक बळकट करण्याचे कार्य येत्या काळात निश्चितपणे घडेल, असा विश्वास मराठा समाजात व्यक्त केला जात आहे.